नरेश डोंगरे
नागपूर : सनी जागींड अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे नागपुरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील आपसी वैमनस्य आणि पोलिस ठाण्यातील अधिकार्यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू असताना पोलीस कशी नेभळट भूमिका वठवीत आहे, तेसुद्धा उघड झाले असून या थरारकांडामुळे अजनी पोलीस आरोपीच्या पिंजऱ्यात अडकले आहे.
या प्रकरणाच्या निमित्ताने गुन्हेगारी वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार, फेब्रुवारी २०२० मध्ये आरोपी ललित रेवतकर याच्यावर सनी जांगिड आणि साथीदारांनी कुर्हाडीने हल्ला केला होता. त्यानंतर २० मे रोजी आरोपी स्मारक जाधव आणि त्याचा भाऊ सुदर्शन जाधव या दोघांवर सनी जांगिड आणि साथीदारांनी प्राणघातक हल्ला चढवला होता.
हे दोन्ही गुन्हे अजनी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांनी यावेळी जुजबी कारवाई करून प्रकरण मिटवले. त्यामुळे त्या प्रकरणातील आरोपी सनी आणि साथीदार मोकाट राहिले. त्याचमुळे जाधव, रेवतकर आणि त्याच्या साथीदारांनी सनीच्या अपहरण आणि हत्येचा कट रचला अन हा गुन्हा घडला. अजनी पोलिसांनी उपरोक्त दोन्ही गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले असते तर हा भयंकर गुन्हा टळला असता. अजनी पोलिसानी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडता गुन्हेगारांना पूरक भूमिका घेतली. त्याचमुळे हे घडले. म्हणून या अपहरण आणि हत्याकांडाला अजनी पोलिसही जबाबदार असल्याची जोरदार चर्चा आहे.
कुठे आहे पोलिसांचे लक्ष
एका मोपेडवर भर दुपारी तिघे गुन्हेगार प्रतिस्पर्धी गुन्हेगाराला करकचून पकडून बसवतात. त्याचे अपहरण करून पाच ते सात किलोमीटर दूर भरवस्तीतून चौबल सीट नेले जाते. त्यांच्याकडे कोणत्याच पोलिसाचे लक्ष कसे जात नाही, हा कळीचा मुद्दा आहे.
आठ तास छळ, पाच लाखांसाठी फिरवले
आरोपी मोनू रायडर, ललित रेवतकर आणि आकाश शेवारे यांनी सनी जागींडचे शनिवारी दुपारी २.३० ला अपहरण केले. त्याला हुडकेश्वरच्या जंगलात नेऊन तासभर मारहाण केली. जागोजागी चटके दिले. सनी सोडून देण्यासाठी गयावया करीत होता. आरोपींनी त्याला ५ लाख देशील तर सोडून देऊ, असे म्हटले. सनीने तयारी दाखविताच आरोपींनी त्याला नागपूरात आणले. उमरेड मार्गाने इकडे तिकडे फिरवले. सनीने एका ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोपींनी त्याला पुन्हा जंगलात नेले आणि रात्री ११ च्या सुमारास त्याची हत्या केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.
वरिष्ठांचे आदेश धाब्यावर
या गुन्ह्यामुळे अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर, त्यांच्या हालचालीवर सूक्ष्म नजर ठेवा. आणि त्यांच्या गुन्हेगारी कारवाया नियंत्रित करा, असे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याला वारंवार दिले जातात. पोलीस ठाण्यातील अधिकारी वरिष्ठांच्या आदेशवजा सूचना फारशी गांभीर्याने घेत नसल्याचेही या गुन्ह्यातून स्पष्ट झाले आहे.
कसला हिशेब चालतो दिवसभर?
गुन्हेगार मोकाट फिरून अपहरण हत्या सारखे गंभीर गुन्हे करत असताना पोलिस ठाण्यातील अधिकारी दिवसभर कोणता हिशेब तपासण्यात व्यस्त असतात, असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. पदावरील काही मंडळी प्रीती, मोह, मायात गुंतल्याने सैरभैर झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांना दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.