मुंबई : पैशांसाठी वर्षभराच्या मुलीचे अपहरण करून तिला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यासह चौघांच्या मुसक्या चारकोप पोलिसांनी आवळल्या. अवघ्या दोन तासात या अपहरणाचा गुंता सोडवत मुलीची आईशी भेट घडवून आणणाऱ्या चारकोप पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे.सचिन येलवे (४०), सुप्रिया येलवे (३५), रश्मी रत्नाकर नायक ऊर्फ रश्मी राजू पवार (२९) आणि राजू मोहन पवार (३६) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. सुनीता गुरव या घरकाम करतात. भूमी पार्क समोरील फुटपाथवर त्या पती आणि मुलीसोबत २ नोव्हेंबर, २०२० रोजी रात्री झोपल्या असताना त्यांच्या एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. याची तक्रार त्यांनी चारकोप पोलिसांना दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेत परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर आणि चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत ढेंबरे यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याच्या मदतीने अवघ्या दोन तासात त्यांनी अपहृत मुलीला शोधून काढले आणि पालकांकडे सुपूर्द केले. येलवे जोडप्याला मूलबाळ नसल्याने पवार दाम्पत्याने मुलीला २ नोव्हेंबर रोजी पळवले आणि येलवेंना दिले. मुलगी लहान असून ती बोलू शकत नसल्याने पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत असा गैरसमज अपहरणकर्त्यांना होता. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांचा गाशा गुंडाळल्याने मुलीची सुखरूप सुटका करण्यात त्यांना यश मिळाले.
चारकोपमध्ये पैशांसाठी वर्षभराच्या मुलीचे अपहरण!, दोन तासात अपहरणकर्ते गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 5:48 AM