अहमदनगर: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक शंतात धोक्यात आणणाऱ्या गुंडावर वचक निर्माण करण्यासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शुक्रवारी श्रीगणेशा केला. जामखेड, श्रीगोंदा आणि लोणी येथील गुंडावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचा आदेश काढण्यात आला आहे. एकाच दिवशी तीन गुंडावर कारवाई झाल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सागर गवासणे उफ सागर मराठा ( रा. पिपळगाव ऊंडा, ता. जामखेड), सुभाष कोंडीबा चौधरी (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा), कुंदन मार्कस आरवडे (रा. प्रवरानगर, ता. राहाता ) असे कारवाई केलेल्यांची नावे आहेत. गणेशा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून १२ सराईतांचे प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी जिल्हाप्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत.
यातील तिघा सराईतांच्या कारवाईस मंजूरी देण्यात आली आहे. गणेश उत्सव तोंडावर आल्याने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील भाईगिरी मोडीत काढण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तिघा सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.