बारामती शहरातील कृष्णा जाधव खून प्रकरणातील फरारी आरोपीला दोन वर्षानंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 02:14 PM2020-09-05T14:14:53+5:302020-09-05T14:19:41+5:30
३० लाख रुपये खंडणीची खंडणी दिली नाही म्हणुन आरोपींनी खून केला...
बारामती: बारामती शहरातील कृष्णा जाधव या गाजलेल्या खुन खटला प्रकरणी फरारी आरोपीला दोन वर्षांनी अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. मोठा बिट्या उर्फ सचिन रमेश जाधव (वय २७,रा कॉलनी,तांदुळवाडी,बारामती)असे फरारी आरोपीचे नाव आहे.पोलीस निरीक्षक औदुुंबर पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
याबाबत माहिती अशी, गुन्ह्यातील एकुण २१ आरोपींनी कृष्णा जाधव यास वेळोवेळी ३० लाख रुपये खंडणीची मागणी केली होती.खंडणी दिली नाही म्हणुन वरील आरोपींनी संगनमत करून कट रचला. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी कृष्णा उर्फ नाना महादेव जाधव( वय ५५ वर्षे रा.कैकाडगल्ली ,नेवसेरोड ,बारामती) हे त्यांचे चालक प्रभाकर पवार याला बारामती हॉस्पीटल प्रा.लि.बारामती येथे पाहण्यासाठी जात होते.यावेळी ते एकटे आहेत हे पाहुन व पाळत ठेवुन रस्त्यामध्येच त्यांच्यावर धारदार हत्याराने शरीरावर वार करून खून करण्यात आला. त्यांच्या खुनाबाबत त्यांची पत्नी सपना कृष्णा जाधव यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात एकुण २१ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये एकुण ४ विधीसंघर्षीत बालक होते. त्यानंतर तर सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे वाढीव कलम लावुन गुन्हयास मोक्का लावण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुर्वीपासुन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी तपास केला आहे. यामध्ये शिरगांवकर यांनी आजपर्यंत गुन्हयातील १७ आरोपीस अटक करून मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे.
गुन्हयातील हवा असलेला आरोपी क्रमांक ११) मोठा बिटया उर्फ सचिन रमेश जाधव हा खून झाल्याच्या दिवशीपासुनच फरार झालेला होता. तसेच त्याने स्वता:कडील मोबाईल क्रमांक बंद करून इतर नातेवाईक, मित्रांशी संपर्क करण्याचे बंद केलेले होते. मात्र, तो सोलापुर शहरात सलगरवस्ती परिसरात राहत असल्याची माहिती सोलापुर शहर पोलिसांनी कळविले होते. त्यानंतर शहर पोलिसांनी सलगरवस्ती पोलीस ठाणे यांचे मदतीने फरार आरोपीस ताब्यात घेतले. त्याला ३ सप्टेंबर रोजी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान अटक करण्यात आली आहे.
आरोपीस मोक्का न्यायालयाने ६ दिवस पोलीस कोठडी दिली आहे. अटक आरोपी जाधव याचेवर शहर पोलीस ठाण्यात एकुण ८ गुन्हे दाखल आहेत.न्यायालयाने त्याची दखल घेतलेली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगांवकर करीत आहेत.
———————————————————