कृष्णा जाधव खूनप्रकरणी फरारी आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 01:41 AM2019-03-19T01:41:56+5:302019-03-19T01:42:05+5:30
मटका व्यावसायिक कृष्णा ऊर्फ नाना महादेव जाधव खूनप्रकरणी फरारी आरोपींपैकी एका आरोपीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
बारामती - शहरातील मटका व्यावसायिक कृष्णा ऊर्फ नाना महादेव जाधव खूनप्रकरणी फरारी आरोपींपैकी एका आरोपीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गणेश विठ्ठल माने (वय ३२, व्यवसाय मजुरी, रा. कैकाडी गल्ली, बारामती, ता. बारामती, जि. पुणे) असे या आरोपीचे नाव आहे. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी कृष्णा जाधव याचा धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला होता.
याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी माहिती दिली. त्यानुसार गतवर्षी ५ नोव्हेंबरलाकृष्णा जाधव याचा दिनेश रावसाहेब वायसे, विनोद शिवाजी माने, गणेश विठ्ठल माने, अनिल संभाजी माने, सुनील संभाजी माने, प्रेम दिनेश वायसे, अविनाश जाधव, संदीप जाधव, चिमी ऊर्फ वैष्णवी अशोक जाधव, रवी माकर, मोठ्या बिट्या ऊर्फ सचिन रमेश जाधव, लोकेश परशुराम ऊर्फ दत्तात्रय माने, गुलाब उत्तम माने यांना खंडणी दिली नाही. त्यामुळे सर्वांनी संगनमत करून कट रचून धारदार हत्याराने कृष्णा जाधव याचा निर्घृणपणे खून केला होता.
हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिले होते. या गुन्ह्यातील आरोपी गणेश विठ्ठल माने माळेगाव (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील एका कंपनीत कामास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला अटक करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस नाईक गुरू गायकवाड, पोलीस नाईक सुभाष राऊत, पोपट गायकवाड, सचिन गायकवाड, अक्षय नवले यांच्या पथकाने माहिती काढली. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला. यावेळी गणेश विठ्ठल माने (वय ३२, व्यवसाय मजुरी, रा. कैकाडी गल्ली, बारामती, ता. बारामती, जि. पुणे) (मौजे माळेगाव, ता. सिन्नर, जि. पुणे) येथील इंडियन पॉलिमर कंपनी येथे मिळून आला. त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.