अकोला : ‘एमआयडीसी’ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक वसाहत महामंडळाच्या फेज क्रमांक-४ मध्ये जीके कंपनीमध्ये कामाला असलेल्या दोन मजुरांमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा वाद झाल्याने या वादातच एका मजुराने दुसऱ्या मजुराची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उजेडात आली. अरविंद विश्वकर्मा असे मृतकाचे नाव असून, अजय गौतम नामक मजुराने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाच्या फेज क्रमांक-४ मध्ये जीके नामक एक उत्पादन निर्माण करणारी कंपनी आहे. या कंपनीमध्ये उत्तर प्रदेशातील अरविंद विश्वकर्मा तसेच अजय गौतम हे दोघे बºयाच दिवसांपासून कामाला आहेत. लॉकडाउन लागल्यानंतर या दोघांनीही गावी परत जाण्याचा निर्णय घेतला; मात्र परत जाता येत नसल्याने ते येथे थांबून होते. या अशाच प्रकारच्या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा वाद सुरू झाले. याच वादात अजय गौतम या मजुराने त्याचा साथीदार असलेल्या अरविंद विश्वकर्मा यांची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर रात्रीच्या अंधारातच विश्वकर्मा यांचा मृतदेह एमायडीसीमधील एका परिसरात खड्डा खोदून त्यामध्ये गाडला; मात्र शनिवारी पहाटे अरविंद विश्वकर्मा कामावर नसल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या दोघातील वादाची चर्चा उजेडात आली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी कसून चौकशी सुरू केल्यानंतर जीके कंपनीतील अरविंद विश्वकर्मा व अजय गौतम या दोघात प्रचंड वाद झाल्याने अजय गौतम याने विश्वकर्मा यांची दगडाने ठेचून हत्या करून त्यांचा मृतदेह जमिनीत गाडण्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सदर घटनास्थळ गाठून अरविंद विश्वकर्मा यांचा मृतदेह बाहेर काढला. तसेच उत्तरीय तपासणीसाठी तो सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने अजय गौतम याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. ही हत्या नेमकी कोणत्या वादातून करण्यात आली, याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अजय गौतम याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत असून, या हत्याकांडामागील सत्य उजेडात आणण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
अकोला : ‘एमआयडीसी’त मजुराची निर्घृण हत्या करून गाडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 4:37 PM
एका मजुराने दुसऱ्या मजुराची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उजेडात आली.
ठळक मुद्दे दोन मजुरांतील वादाने घेतला एकाच बळीदोन्ही मजूर उत्तर प्रदेश येथील रहिवासी