मुंबई - एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड सेंटरमधून बोलत असल्याची बतावणी करून दिल्लीच्या तीन भामट्यांनी माटुंगा येथील एका गृहिणीला एक लाखांना गंडा घातला आहे. मात्र, वेळीच आपली फसवणूक होत असल्याचे समजताच त्या महिलेने कस्टमर केअरला कॉल करून कार्ड ब्लॉक केले आणि माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या तीन भामट्यांनी केलेले चौथे ट्रान्झॅक्शन रद्द झाले. नेमक्या याच रद्द झालेल्या ट्रान्झॅक्शनची डिटेल माटुंगा पोलिसांसाठी आरोपींना बेडया ठोकण्यास महत्वाचा धागादोरा ठरला आणि दिल्लीतून त्रिकुटाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. मुख्य आरोपी साहिल हाशमी (वय २०), विपीन पाल (वय २०) आणि रवीकुमार माथूर (वय २२) ही आरोपींची नावे आहेत.
माटुंगा येथे राहणारे चंद्रशेखर गद्रे (वय - 53) हे पालिकेत कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी शीतल गद्रे यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे. शीतल यांना 3 जुलै रोजी कॉल आला होता. एसबीआयच्या क्रेडिट कार्ड सेंटरमधून बोलत असल्याचे कॉलर म्हणाला. तुमचे कार्ड बंद होणार असून ते चालू ठेवण्यासाठी कार्डची डिटेल द्या असे कॉलर म्हणाला. त्यानुसार शीतल यांनी कार्डची सर्व माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपी नंबर आले. ते नंबरदेखील शीतल यांनी कॉलरला दिले. ओटीपी नंबर मिळताच आरोपींनी शीतल यांच्या कार्डवरून चार ट्रान्झॅक्शन करून एक लाख रुपये आपल्या बँक खात्यात वळवले. दरम्यान, आपल्या बँक खात्यातून पैसे जात असल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर शीतल यांनी लागलीच कॉल सेंटरला कॉल करून त्यांचे कार्ड ब्लॉक केले. वेळीच कार्ड ब्लॉक झाल्यामुळे आरोपींनी केलेले चौथे ट्रान्झॅक्शन रद्द झाले. त्यानंतर माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन शीतल यांनी तक्रार दाखल केली. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाटणकर, उपनिरीक्षक मारुती शेळके, अंमलदार विकास मोरे आणि संतोष पवार यांनी तपास करून शीतल यांना गंडा घालणाऱ्या दिल्लीतल्या भामट्यांना पकडून आणले.
काही दिवसांपूर्वी साहिल हा मुख्य आरोपी दिल्लीतल्या एका कॉल सेंटरमध्ये कामाला होता. सर्व कामकाज शिकल्यानंतर त्याने कॉल सेंटर सोडले आणि लोकांना फसविण्यास सुरुवात केली. यासाठी विपिन त्याला बँक खाती आणि सिमकार्ड पुरविण्याचे काम करायचा, तर म्होरक्या साहिल त्याच्या घरात बसून लोकांना फोन करायचा आणि खोटी बतावणी करून पैसे वळते करून घ्यायचा. त्याच्या घरातून दोन लॅपटॉप, 22 सिमकार्ड, तीन फोन, 58 सिमकार्डचे कव्हर, नागरिकांच्या क्रेडिट कार्डची माहिती असलेले 40 ते 50 कागद हस्तगत केले आहेत. पैसे वाळविण्यासाठी साहिल हा रवीकुमारच्या बँक खात्याचा वापर करी. आरोपी विपीनने चौथ्या ट्रान्झॅक्शन करत त्याच्यासाठी आयफोन एक्सची ऑर्डर केली होती. मात्र, शीतल यांनी कार्ड ब्लॉक केल्याने ते ट्रान्झॅक्शन रद्द झाले. नेमका हाच मूळ धागा पकडत पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी विपिनचा माग कधी;या असता तो दिल्लीचा असल्याचे स्पष्ट होताच त्याला तिकडे जाऊन जेरबंद करण्यात आले. त्यानंतर विपीनच्या अधिक चौकशीत मुख्य सूत्रधार साहिल हाशमीला अटक करण्यात आली. पैसे वाळविण्यासाठी आपले बँक खाते वापरण्यास देणाऱ्या रवीकुमार मथुरेला बेड्या ठोकण्यात आल्या.