जमिनीचा वाद :तक्रार मागे घेण्यासाठी तरुणाला मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:13 AM2021-04-03T08:13:06+5:302021-04-03T08:14:03+5:30
पडघाजवळील राहुर गावात जमिनीच्या वादातून निर्माण झालेला वाद विकोपाला गेल्याने केलेल्या तलवार हल्ल्यातील फरार हल्लेखोरांनी तक्रारदारांनी पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी कारने दुचाकीला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली.
भिवंडी : पडघाजवळील राहुर गावात जमिनीच्या वादातून निर्माण झालेला वाद विकोपाला गेल्याने केलेल्या तलवार हल्ल्यातील फरार हल्लेखोरांनी तक्रारदारांनी पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी कारने दुचाकीला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. यात सद्दाम चिखलेकर (२९) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
त्याचे काका व काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष जव्वाद चिखलेकर हेही हल्लेखोरांच्या रडारवर असल्याने त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. हल्लेखोर त्यांचा सतत पाठलाग करीत असल्याने त्यांनी याविरोधात ठाणे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. मात्र पडघा पोलीस लक्ष देत नसल्याचा आरोप चिखलेकर यांनी केला आहे. चार महिन्यांपासून फरार असलेले आरोपी यासिन व अझरुद्दीन चिखलेकर या भावांसोबत सय्यम पटेल याच्या विरोधात दुचाकीला धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सद्दाम याचे वडील मज्जिद यांचा यासिन व अझरुद्दीन यांच्यात मागील काही वर्षांपासून जमिनीचा वाद सुरु आहे. या वादातून २० नोव्हेंबर २०२० रोजी या दोन्ही आरोपींनी मज्जिद व त्यांचा मुलगा अरबाज यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला होता. त्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून यासिन व अझरुद्दीन हे दोघेही फरार आहेत. दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी गावातील रौउफ रेहमान याने मज्जिद यांना भेटून तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले होते. २५ मार्च रोजी सद्दाम हा कामासाठी रात्री दुचाकीवरून निघाला असता त्याच्या पाळतीवर असलेल्या कारने त्यास रस्त्यात गाठले. त्यानंतर सद्दाम हा तुळशी गावातील आपल्या जमिनीवर दुचाकी उभी करून थांबला असता पाळतीवर असलेली कार त्या ठिकाणी येऊन दुचाकीसह सद्दाम यास जोरदार धडक देऊन पसार झाली.त्यावेळी कुटुंबीयांनी पडघा पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हल्लेखोरांवर १७ ते १८ गुन्हे दाखल
फरार हल्लेखोरांवर विविध पोलीस ठाण्यात १७ ते १८ गुन्हे दाखल आहेत .त्यामुळे त्यांनीच हा हल्ला केला असल्याने त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पत्र पाठवले आहे अशी माहिती काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष जव्वाद चिखलेकर यांनी दिली आहे. मलाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सुरु असून सतत पाठलाग करण्यात येत आहे. त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्याकडे केली आहे.