पुण्यात 'लादेन' गँग उद्ध्वस्त; स्वारगेट पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 08:25 PM2020-11-13T20:25:54+5:302020-11-13T20:28:13+5:30

Crime News : चौघांकडून ११ पिस्तुलासह ३१ काडतुसे हस्तगत : महाविद्यालयीन तरुण गुन्हेगारीत

Large arms seized from Swargate police in Pune | पुण्यात 'लादेन' गँग उद्ध्वस्त; स्वारगेट पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

पुण्यात 'लादेन' गँग उद्ध्वस्त; स्वारगेट पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

googlenewsNext

पुणे : वानवडीतील खुनाच्या प्रयत्नातील फरार असलेल्या आरोपीकडून आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन  स्वारगेट पोलिसांनी ११ पिस्तुले आणि ३१ काडतुसे असा एकूण ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. या आरोपींनी विकलेल्या दोन पिस्तुलांचा वापर वानवडी आणि वेल्हे येथील गोळीबाराच्या गुन्ह्यात करण्यात आला आहे.


बारक्या ऊर्फ प्रमोद श्रीकांत पारसे (वय १९, रा. आंबेगाव पठार), राजू अशोक जाधव (वय २०, रा. माणगाव, ता़ हवेली), बल्लुसिंग करतारसिंग शिकलीगर (वय ४९, रा.निमखेडी, जि़ बुलढाणा), लादेन ऊर्फ सोहेल मोदीन आसंगी (वय २४, रा. टेल्को कॉलनी, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 


याबाबत अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर, उपायुक्त सागर पाटील यांनी माहिती दिली. वानवडी परिसरात काही दिवसांपूर्वी वाळु सप्लायरवर भरदिवसा गोळीबार झाला होता. त्या गुन्ह्यातील आरोपीला पिस्तुल पुरविणारा व सध्या फरार असलेल्या आरोपी बारक्या हा स्वारगेट येथील पीएमपी बसस्थानकावर मित्राची वाट पहात थांबला असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली.


त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बारक्या याला पकडले. त्याच्याकडून २ गावठी पिस्तुले आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने राजू जाधव याला एकूण १३ गावठी पिस्तुल व काडतुसे विकण्यास दिल्याचे सांगितले. त्यानुसार राजू जाधव याला पकडून त्याच्याकडून १ गावठी पिस्तुल व ४ काडतुसे जप्त करण्यात आली. प्रमोद व राजू यांनी त्याच्या ओळखीच्या लादेन याला ४ पिस्तुले विकल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी लादेन याला पकडून त्याच्याकडून ३ पिस्तुल व ८ काडतुसे जप्त केली. त्याने राजू जाधव याच्याबरोबर बुलढाणा येथे जाऊन बल्लुसिंग शिकलीगर याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिकलीगर याला अटक केली़.


लादेन याने त्यातील पिस्तुल संदीप धुमाळ याला विकल्याचे सांगितले़ धुमाळ याने वेल्ह्यामध्ये त्यामधून गोळीबार केला होता़ त्याला ग्रामीण पोलिसांनी पकडले असून पिस्तुल जप्त केले आहे़ राजू आणि बारक्या हे दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत़ राजू याचे नातेवाईक बुलढाणा जिल्ह्यातील निमखेडा येथे राहणारे आहेत़ तेथे त्यांची शिकलीगर याच्याशी ओळख झाली होती़ त्यातून त्यांनी त्याच्याकडून पिस्तुले आणून येथे दुप्पट किमंतीला विकली होती़ ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, हवालदार महेंद्र जगताप, पंढरीनाथ शिंदे, अरुण पाटील, रामचंद्र गुरव, विजय कुंभार, विजय खोमणे, महेश बारवकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, अमित शिंदे, वैभव शितकाल, महेश काटे, भूषण उंडे, बाबासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांनी केली़

भविष्यात अनेक गुन्हे टाळणारी कारवाई
बुलढाण्यातून आणून विकलेल्या ११ पिस्तुलांपैकी २ पिस्तुलांचा प्रत्यक्ष गोळीबारात वापर करण्यात आल्याचे या तपासातून  निष्पन्न झाले आहे़ हे पाहता स्वारगेट पोलिसांनी चौघा आरोपीकडून पकडलेली ११ पिस्तुले आणि ३१ काडतुसे ही मोठी कारवाई ठरली आहे़ जप्त केलेल्या या पिस्तुलातून आणखी काही ठिकाणी भविष्यात वापर होऊन त्यातून काही गुन्हे घडण्याची शक्यता होती़ तसेच या पिस्तुलांचा धाक दाखवून लोकांना लुबाडण्याचे गुन्हे होण्याची शक्यता होती़ त्यामुळे या कारवाईने शहरातील अनेक गुन्हे व काही जणांचे जीव वाचले आहेत़

Web Title: Large arms seized from Swargate police in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.