रात्री आई-वडिलांना अखेरचा फोन; गडचिराेलीतील अभियंता तरुणीने पुण्यात आयुष्य संपविले
By दिलीप दहेलकर | Published: March 19, 2023 02:45 PM2023-03-19T14:45:50+5:302023-03-19T14:45:59+5:30
रात्री आई-वडिलांना अखेरचा फोन; गडचिराेलीतील अभियंता तरुणीने पुण्यात आयुष्य संपविले
गडचिराेली : येथील रहिवासी व पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या एका अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १९ मार्चला सकाळी उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
साहिली वासुदेव बट्टे (२४,रा. झाशीनगर, चंद्रपूर रोड, गडचिरोली) असे त्या तरुणीचे नाव आहे. भाजप नेते वासुदेव बट्टे व माजी नगरसेविका वर्षा वासुदेव बट्टे यांची ती कन्या आहे.
ती पुण्यात राहत होती. एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या साहिलीने १८ मार्चला रात्री पुण्यातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १९ रोजी सकाळी उघडकीस आली, त्यानंतर बट्टे दाम्पत्याने तातडीने पुण्याला धाव घेतली आहे.
फोनवरील तो संवाद ठरला अखेरचा...
साहिलीसोबत तिचा भाऊ काही दिवस पुण्यात राहत होता, पण तो गावी परतला होता. त्यामुळे ती एकटीच राहत होती. दरम्यान, १८ रोजी रात्री साहिलीने घरी फोन केला. यावेळी तिने आई- वडिलांशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला. मात्र, हा संवाद अखेरचा ठरेल, याची कल्पना आई- वडिलांना नव्हती.