दुबईतून डिपोर्ट केलेला लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्प शूटर हर्ष उर्फ चिंटू याने पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांसाठी अमेरिका हे नवीन ठिकाण बनत आहे. दिल्लीतील खळबळजनक हत्याकांडानंतर फरार झालेल्या चिंटूने पंजाबमधून बनावट पासपोर्ट बनवून अमेरिकेत पोहण्याचा प्लॅन केला होता.
शूटर हर्षने सांगितलं की, त्याला प्रथम पंजाबमधून बनावट पासपोर्ट मिळाला, ज्यामध्ये त्याचं नाव प्रदीप कुमार होतं. यानंतर तो शारजाह, नंतर बाकू आणि नंतर युरोपमधील एका देशात गेला. डंकी रूटने अमेरिकेत पोहोचणं हे त्यांचं शेवटचं उद्दिष्ट होतं. हर्षचा हा खुलासा भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनला आहे कारण मोठ्या संख्येने भारतीय गँगस्टर्स आता अमेरिकेला त्यांचं लपण्याचं नवीन ठिकाण बनवत आहेत.
लॉरेन्स बिश्नोई गँगमधील गोल्डी बराड, अनमोल बिश्नोई, रोहित गोदारा, मॉन्टी मान, पवन बिश्नोई आणि इतर सदस्यांनीही याच मार्गाचा आधार घेत अमेरिकेत आश्रय घेतला आहे. हिमांशूसारखे गँगविरोधी लोकही या यादीत सामील झाले आहेत. हे सर्वजण अमेरिकेत बसून भारतात वेगाने गुन्हेगारी कारवाया करत आहेत.
भारतीय एजन्सीसमोर सर्वात मोठे आव्हान हे आहे की, अमेरिका कोणत्याही वॉन्टेड गुन्हेगाराला भारताच्या ताब्यात देण्यास सहजासहजी तयार नाही. हर्ष उर्फ चिंटू याने ९ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील नजफगढ येथे खळबळजनक हत्या केली होती, मात्र तो अमेरिकेत पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, परंतु तो दुबईत पकडला गेला. पोलीस त्याची सतत चौकशी करत आहेत.