मुंबई - विलेपार्लेसारख्या उच्चभ्रू परिसरात हुंड्यासाठी छळणाऱ्या कुटुंबाविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच सुनेचे कपडे फाडून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या सासऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
२००७ साली पीडित महिलेचं विलेपार्ल्यात राहणाऱ्या इसमाशी लग्न झालं. अनेक वर्ष संसार सुरळीत सुरु होता. मात्र २००९ नंतर सासू आणि सासरची मंडळी पीडित महिलेला नाहक त्रास देऊ लागली. तसेच माहेरहून पैश्यांची मागणी सासरची लोकं करत असत. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून सासूने वाद घातला आणि वाद इतका विकोपाला गेला की पीडित महिलेला सासूने शिवीगाळ केली. बेडरुममध्ये रडत बसलेल्या पीडित महिलेचा बेडरूमचा दरवाजा जोरदार ठोठावला असता पीडित महिलेच्या मुलाने दरवाजा उघडला. त्यावेळी पीडित महिलेचा पती, सासू, सासरे आणि नणंद बेडरूममध्ये घुसले आणि पीडित महिलेच्या अंगावर धावून जात भांडण सुरु केले. भांडणात झालेल्या झटापटीत सासऱ्याच्या पीडित महिलेचा म्हणजेच सुनेचा नाईट गाऊनचे बटण तुटले आणि गाउन फाटल्याने लज्जा उत्पन्न होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पीडित महिलेने संपूर्ण कुटुंबाविरोधात जुहू पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४९८ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला तर परिमल शहा (६५) या सासऱ्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.