बनावट फेसबुक अकाऊंटमुळे वकिलाची एक लाखाची फसवणूक
By अनिल गवई | Published: October 3, 2023 06:55 PM2023-10-03T18:55:42+5:302023-10-03T18:57:56+5:30
फेसबुक मॅसेंजरवरून आला होता एक मेसेज
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (बुलडाणा): फेक फेसबुक अकाऊंटवरुन आलेल्या मॅसेजला प्रतिसाद दिल्याने येथील वकील संघाचे अध्यक्ष एड. संजय बडगुजर यांची तब्बल १ लाखाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत बडगुजर यांच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, त्यांना ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी त्यांच्या मेहकर येथील सरकारी अधिकारी असलेल्या मित्राच्या फेसबुक मॅसेंजरवरून एक मेसेज आला. एका सीआरपीएफ अधिकार्याचे घरातील काही सामान विकणे आहे. आवडल्यास घेवू शकता असा मजकुर त्या मेसेजमध्ये होता. तसेच संबंधित सिआरपीएफ अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर देखील त्यात दिलेला होता.
बडगुजर यांनी नंबरवर संपर्क साधला असता त्या व्यक्तीने सामानाचे काही फोटो पाठविले. संबंधित सामान विकायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी बडगुजर यांनी प्रतिसाद देत त्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे त्यांच्या गुगलपेवरून ९३५१९८३४७६ या क्रमांकावर तीन टप्प्यात १ लाख रुपये सेंड केले. त्यानंतर अॅड. बडगुजर यांनी त्यांच्या मेहकर येथील मित्राला फोन करुन ही बाब सांगितली. दरम्यान, या सर्व प्रकाराचा उलगडा झाला. त्यांच्या मित्राच्या नावाने कुणीतरी फेक फेसबुक' अकाऊंट तयार करुन बडगुजर यांची फसवणुक केली. याबाबत त्यांनी सायबर पोलीसात तक्रार दिली असून त्यावरुन सायबर पोलीसांनी अज्ञाताविरुध्द कलम ४१९, ४२० भादंवी सहकलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (आय), ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सारंग नवलकर करीत आहेत.