भंडारा : चोरटे कधी आणि काय चोरतील याचा नेम नाही. भंडारा शहरात चक्क एका पोलीस शिपायाची वर्दीच चोरीस जाण्याची घटना उघडकीस आली. एलसीबीत कार्यरत शिपाई रात्री कर्तव्यावर असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून ही चोरी झाली. याप्रकरणी भंडारा शहर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात पोलीस शिपाई कौशिक गजभिये कार्यरत आहेत. भंडारा शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वॉर्डात ते खोली भाड्याने घेवून राहतात. शनिवारी रात्री ते कर्तव्यावर होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या गेटखालून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. हॅंगरवर लटकून असलेली जुनी वापरातील खाकी रंगाची पॅन्ट, नेम प्लेट, शर्टवरील पोलीस टॅग, बक्कल नंबर असलेला बेल्ट आणि २०० रुपये किंमतीची बॅग तसेच एका खोलीचे कुलूप तोडून आतमधून तीन हजार रुपये रोख लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळी कर्तव्य संपून गजभिये घरी परत आले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. तसेच भंडारा शहर ठाणे गाठून या चोरीची तक्रार दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील विविध घटनांचा छडा लावतात. आव्हानात्मक गुन्ह्यांचा शोध त्यांच्याकडे येतो. मात्र, आता चोरट्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या शिपायाच्या घरी चोरी करुन तेही पोलीस वर्दी चोरुन एकप्रकारे पोलिसांना आव्हानच दिले.