नेत्याचा मुलगा वकिल आणि पोलिसाच्या पत्नीचा प्रताप : ४२ लाख ७२ हजार हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:20 AM2020-01-14T00:20:47+5:302020-01-14T00:22:09+5:30
माजी मंत्र्याचा मुलगा, वकिल, वकिलाची पत्नी, पोलीस अधिका-याची पत्नी आणि बिल्डर अशा मिळून सात जणांनी एका निवृत्त वेकोलि अधिका-याला ४३ लाखांचा गंडा घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी मंत्र्याचा मुलगा, वकिल, वकिलाची पत्नी, पोलीस अधिका-याची पत्नी आणि बिल्डर अशा मिळून सात जणांनी एका निवृत्त वेकोलि अधिका-याला ४३ लाखांचा गंडा घातला. या सर्वांविरुद्ध आज अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रदीप बिमल बोस (६२, रा. विदर्भ थेटर कर्मशियल कॉम्प्लेक्स, तिरंगा चौक, कोतवाली) असे पीडिताचे नाव आहे. तर, आरोपींमध्ये दिनेश बाबूराव मडावी, सुमित्रा दिनेश मडावी (रा. टिळकनगर), धनंजय विजयराव धोंडारकर (वय ४१), सोनाली धनंजय धोंडारकर (वय ३४, रा. अवतार मेहरबाबा सोसायटी, भोले पेट्रोल पंपाजवळ, नागपूर), रॉयल डेव्हलपर्सचा मालक अरुण महेश्वरी श्रीवास्तव (रा. प्रेमिला अपार्टमेंट, पांडे लेआऊट खामला), जयश्री अशोक बागुल (रा. एनएचके सोसायटी, उदयनगर) आणि रवींद्र बालाजी गोविंदवार (वय ४२, रा. बालाजीनगर) या सर्वांचा समावेश आहे. यातील दिनेश आणि सुमित्रा हे दाम्पत्य माजी मंत्री मडावी यांचा मुलगा आणि सून होय. धोंडारकर वकिल आहेत. जयश्री बागुल यांचे पती शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर,महेश्वरी बिल्डर आणि गोविंदवार वादग्रस्त बिल्डर-डेव्हलपर्समधून चर्चेत आहेत.
फिर्यादी प्रदीप बोस कोल इंडिया कंपनीतून व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी २०१० पासून स्वत:च्या मालकीचा जुना फ्लॅट चांगला बनवावा या हेतूने आपल्या मित्रांकडे सल्ला विचारला होता. त्यातून ते २०१२ मध्ये रॉयल डेव्हलर्पचे मालक अरूण श्रीवास्तव यांच्या संपर्कात आले. त्यांनी काही रक्कम हडपल्यानंतर वकिल धनजय आणि त्यांची पत्नी धोंडारकर यांच्या पुढे पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांच्या पत्नी जयश्री बागुल आणि माजी मंत्री बाबुराव मडावी यांचा मुलगा दिनेश आणि सून सुमित्रा दिनेश मडावी तसेच रवींद्र गोविंदवार यांच्या संपर्कात आले. आठ वर्षांत या सर्वांनी मिळून बोस यांचे ४२ लाख, ७२ हजार हडपले. त्यांना सदनिका मात्र उपलब्ध करून दिली नाही.
निवृत्तीनंतर हवालदिल झालेले बोस आणि सदनिका किंवा रक्कम मिळावी म्हणून उपरोक्त आरोपींच्या घरी, कार्यालयात चकरा मारू लागले मात्र कुणीही त्यांना दाद दिली नाही. प्रत्येकजण एकदुस-याकडे बोट दाखवत असल्याने अखेर बोस यांनी सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. सीताबर्डी पोलिसांनी काही दिवस चाचपणी केल्यानंतर प्रकरण अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे सांगून घोंगडे झटकले. तर, अंबाझरी पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी करून वरिष्ठ अधिका-यांशी सल्लामसलत केल्यानंतर सोमवारी या प्रकरणात फसवणूकीच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
अनेकांना गंडविले ?
आरोपींनी अशाच प्रकारे अनेकांना गंडविल्याची जोरदार चर्चा आहे. सारेच आरोपी एकमेकांच्या साह्याने पीडितांवर दबाव टाकत असल्याने त्यांच्याविरुद्ध कुणी बोलायला तयार नाही. मात्र, येथे अखेर बोस यांच्या प्रयत्नांना यश आले आणि गुन्हा दाखल झाला. आरोपींना अटक करून त्यांची कसून चौकशी केल्यास फसवणूकीचे मोठे रॅकेटच बाहेर येऊ शकते, अशी चर्चा आहे.