हरयाणातील फरीदाबाद कोर्टाने आज बहुचर्चित निकिता तोमर हत्याकांड प्रकरणातील दोन दोषी तौसिफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तत्पूर्वी कोर्टाने बुधवारी तौसिफ आणि रेहान यांना निकिताच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. तसेच अन्य एक आरोपी अजहरुद्दीनची निर्दोष सुटका केली होती. दोषींच्या वकिलांनी बचाव करण्यासाठी फाशीच्या शिक्षेचा विरोध केला आणि ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ नसल्याचं सांगितलं.
फास्ट ट्रॅक कोर्टाने बुधवारी अवघे बारा मिनिटे निकालाचे वाचन केले. त्यात त्यांनी हत्येसाठी गावठी पिस्तुल उपलब्ध करून देणाऱ्या अजहरुद्दीनला आरोपमुक्त केले. कोर्टाने त्याला सीआरपीसीच्या कलम ३४६ अंतर्गत बेल बॉन्ड भरण्याचे आदेश दिले होते. तर पक्षकार हायकोर्टात गेले तर अजहरुद्दीनला कोर्टात हजर राहावे लागेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले. तर कोर्टाने काल तौसिफ आणि रेहानला दोषी ठरवले.
लग्नास नकार दिल्याने एका तरुणीची तिच्या मैत्रिणीसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना गतवर्षी घडली होती. या घटनेमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. तसेच काही जणांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आता या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला असून, निकिता तोमर या तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपी तौसिफ आणि रेहान यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. दोषी आरोपींना आज शिक्षा सुनावण्यात आली आहे. निकिता तोमर हत्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये एकूणन ५७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना आरोपी तौसिफ आणि रेहान यांना दोषी ठरवले. तर आरोपींना हत्यार पुरवणारा तिसरा आरोपी अझरुद्दीन याला दोषमुक्त केले.
गाजलेल्या निकिता तोमर हत्याप्रकरणी आरोपी तौसिफ आणि रेहान दोषी, शुक्रवारी सुनावणार शिक्षा
नेमके काय आहे हे हत्याकांड प्रकरण ?
ही घटना ऑक्टोबर २०२० रोजी घडली होती. २१ वर्षीय निकिता बी.कॉमच्या अंतिम वर्षाला होती. निकिताची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या दिवशी निकिता परीक्षेसाठी कॉलेजला गेली होती. निकिताच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तौसिफ गेल्या अनेक महिन्यांपासून निकिताशी मैत्री करण्यासाठी दबाव आणत होता. निकिताने अनेकदा त्याला नकार दिला. त्यानंतरही तौसिफ हा लग्नासाठी देखील तिच्यावर दबाव आणत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिताच्या कुटुंबीयांनी २०१८मध्ये तौसिफच्या विरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तौसिफच्या कुटुंबीयांनी विनंती केल्यानंतर निकिताने ही तक्रार मागे घेतली होती. फरीदाबादच्या वल्लभगड येथील कॉलेजबाहेर दिवसाढवळ्या निकिताची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेने देशभर खळबळ माजली होती.