कूकची हत्या करणाऱ्या वेटरला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 02:52 AM2021-04-03T02:52:51+5:302021-04-03T02:53:34+5:30
चायनीज दुकानात काम करताना झालेल्या भांडणाच्या रागातून गॅस सिलिंडर मारून अजित रॉय (३०) या कूकची हत्या करणाऱ्या मंजितकुमार सरोज (३५) या वेटरला ठाणे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी नुकतीच जन्मठेप तसेच मोबाइल चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावली.
ठाणे : चायनीज दुकानात काम करताना झालेल्या भांडणाच्या रागातून गॅस सिलिंडर मारून अजित रॉय (३०) या कूकची हत्या करणाऱ्या मंजितकुमार सरोज (३५) या वेटरला ठाणे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी नुकतीच जन्मठेप तसेच मोबाइल चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावली.
भिवंडीतील पूर्णागावात असलेल्या तंदुरी कॉर्नर आणि चायनीज सेंटर या दुकानात वेटर मंजितकुमार याच्यासह कूक अजित तसेच अन्य कामगार असे तिघे काम करीत होते. कामावरून उद्भवलेल्या वादातून दोघांनी एकमेकांना ५ जुलै २०१७ रोजी रात्री शिवीगाळ केली. ६ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास दुकान बंद केल्यानंतर तिघेही कामगार दुकानात झोपले. मालक घरी निघून गेला; परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी येथील एका पानटपरीचालकाने फोन करून अजितला मार लागल्याची माहिती दिल्यानंतर दुकानमालक आणि त्याचा भाऊ तात्काळ दुकानावर आले. त्यांनी आतमध्ये पाहिले असता, दुकानामध्ये रक्ताच्या थारोळ्यात अजित पडला होता. त्यांनी अजितला नेमके काय झाले, याबाबत विचारल्यानंतर मंजितकुमारने झोपेतच कपाळावर गॅस सिलिंडर मारल्याची त्याने माहिती दिली. मंजितकुमारचा पसार झाला होता. अजितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मोबाइलची केली चोरी
मंजितकुमार विरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याच खटल्याची सुनावणी न्यायाधीश तांबे यांच्या न्यायालयात ३१ मार्च रोजी झाली. खून प्रकरणात जन्मठेप तर मोबाइल चोरीसाठी एक वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.