त्रिपाठीविरोधात लूक आउट नोटीस; अंगडिया वसुली प्रकरण : आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 06:52 AM2022-05-14T06:52:24+5:302022-05-14T06:52:45+5:30
त्रिपाठी यांनी कोणतीही कारवाई न करण्यासाठी १० लाख रुपये प्रतिमहिना मागितल्याची तक्रार अंगडिया व्यावसायिकांच्या संघटनेने केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंगडिया वसुली प्रकरणात आरोपी उपायुक्त सौरभ त्रिपाठीविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे; तर, गुन्हे शाखेने शुक्रवारी त्रिपाठींचे मेहुणे जीएसटी साहाय्यक आयुक्त आशुतोष मिश्रा आणि नोकर पप्पुकुमार गौड यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
त्रिपाठी यांनी कोणतीही कारवाई न करण्यासाठी १० लाख रुपये प्रतिमहिना मागितल्याची तक्रार अंगडिया व्यावसायिकांच्या संघटनेने केली होती. त्रिपाठी यांच्या सूचनेवरून लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, उपनिरीक्षक समाधान जमदाडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे यांनी अंगडिया व्यावसायिकांना अटकाव करीत खंडणी उकळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी निलंबित उपायुक्त सौरभ त्रिपाठी आणि त्यांच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल आहे. मात्र ते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
गुन्हे शाखेने या प्रकरणात अटक केलेल्या तीन पोलिसांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, तर पुरवणी आरोपपत्रात ते मिश्रा आणि गौड यांच्या कथित भूमिकेबद्दल पुरावे सादर करण्यात आले आहेत. पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे शुक्रवारी दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
अहवालासहित महत्त्वपूर्ण माहिती
आठवड्याच्या सुरुवातीला तीन पोलिसांची जामिनावर सुटका झाली होती, तर मिश्रा आणि गौड सध्या कारागृहात आहेत. अंगडियाकडून घेतलेले पैसे त्रिपाठीने मिश्राकडे पाठविले होते. त्यानुसार, आतापर्यंत जप्त केलेले पुरावे, जबाब, तसेच ओळख परेडच्या अहवालासहित अनेक महत्त्वपूर्ण माहितीचा या आरोपपत्रात समावेश आहे.