कर्नाटकात व्यापाऱ्याला लुटले; यावलच्या महिला सरकारी कर्मचाऱ्याला फोन पेने पैसे आले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 11:09 PM2021-10-08T23:09:13+5:302021-10-08T23:09:27+5:30
एकास घेतले ताब्यात : शासकीय कर्मचारी तरुणीही अडचणीत. कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील शांतापूर पोलीस स्टेशन हद्दीत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका व्यापाऱ्याचे सहा लाख रुपये लुटले होते व ते फरार झाले होते.
यावल : कर्नाटक राज्यातील लूटप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी येथील एका शासकीय कर्मचाऱ्याच्या मुलास ताब्यात घेतले. त्यांच्या घरात आश्रयास असलेला एक जण फरार झाला आहे, तर शासकीय कर्मचारी तरुणी मोबाईलमुळे अडचणीत आली आहे. या तरुणीस कर्नाटक पोलिसांनी चौकशी साठी हजर राहण्याची समज दिली आहे. या कारवाईने कर्नाटकातील लूट प्रकरणाचे धागेदोरे यावलपर्यंत पोहोचल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील शांतापूर पोलीस स्टेशन हद्दीत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका व्यापाऱ्याचे सहा लाख रुपये लुटले होते व ते फरार झाले होते. या प्रकरणी तीन संशयितांना कर्नाटक पोलिसांनी कर्नाटकात अटक केली होती. त्यातील दोन संशयित आरोपी हे यावल शहरात असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाली होती. हा संशयित आरोपी एका तरुणीच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले होते. गुरुवारी पहाटे कर्नाटक पोलीस पथक यावलला आले व पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, कॉ. सुशील घुगे, राजेश वाढे, भूषण चव्हाण, राहुल चौधरी, अशोक बाविस्कर यांनी संबंधित तरूणीचा शोध घेतला. तेव्हा ती तरूणी वाघझिरा आश्रमशाळेत कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विचारपूससाठी या तरुणीशी संपर्क केला असता ती यावल येथील बसस्थानकावर असल्याचे तिने सांगितले. तिच्यासोबत आदित्य
सत्यवान पवार हा तरूणदेखील होता. कर्नाटक पोलिसांना हाच तरुण हवा होता. तेव्हा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले व
गुन्ह्यातील एक संशयित शिवकुमार हा पवार यांच्या घरी आश्रयास होता. त्यास ताब्यात घेण्याकरीता पोलीस पथक शहरातील हरिओम
नगरात गेले असता पोलिसांचे वाहने पाहून शिवकुमार तेथून फरार झाला. त्याचा शोध पोलीस घेत असून, आदित्य पवार यास कर्नाटक
पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर तरुणीस शांतापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची समज देण्यात आली आहे.
तरुणीच्या मोबाईलवर टाकले पैसे
आदित्य पवार हा येथील प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. पवार हे मूळचे सोलापूरचे आहे. कर्नाटक पोलिसांनी केलेल्या तपासात आदित्य पवार याने वाघझिरा आश्रमशाळेतील कर्मचारी तरुणीचा मोबाईल गुन्ह्यात वापरला आहे. तिच्या फोन पेवर ५० हजारांची रक्कम देखील टाकली आहे. त्यामुळे ही तरुणी अडचणीत आली आहे.