हरवलेल्या मुलीचा दाेन तासांत घेतला शाेध; पाेलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 12:51 AM2021-01-26T00:51:13+5:302021-01-26T00:51:40+5:30
राेजगाराच्या शाेधात अलिबाग-खंडाळे येथील नितीन नाईक कुटुंब वीटभट्टीच्या कामासाठी हमरापूर गावात गेले हाेते
रायगड : पेण तालुक्यातील हमरापूर येथून बेपत्ता झालेल्या ११ वर्षीय मुलीला पेण-दादर सागरी पाेलिसांनी दाेन तासात शाेधून काढले. वडील रागावल्याने मुलगी रागाने घरातून निघून गेली हाेती. मुलीला पाेलिसांनी तीच्या पालकाच्या स्वाधीन केले.
पेण तालुक्यामध्ये सध्या विटभट्टीच्या व्यवसायाला तेजी आली आहे. राेजगाराच्या शाेधात अलिबाग-खंडाळे येथील नितीन नाईक कुटुंब वीटभट्टीच्या कामासाठी हमरापूर गावात गेले हाेते. रविवारी संध्याकाळी त्यांची ११ वर्षीय निकीता नितीन नाईक ही मुलगी खाऊ आणण्यासाठी हमरापूर गावात गेली होती. ती उशिरा आल्याने तिचे वडील तिला ओरडले. त्यामुळे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रागाने घरातून निघून गेली. बिबट्याच्या अफवेची दहशत आणि रात्रीचे ११ वाजले तरी आपली मुलगी घरी न आल्याने तिची आई शांता नाईक हिने थेट जोहे गावातील दादर सागरी पोलीस स्टेशन गाठून पाेलिसांकेड तक्रार दाखल केली.
दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हमरापूर जंगल भागात शोधाशोध सुरू केली. ‘घरी गेलो तर वडील मारतील’ या भीतीने निकीता ही झाडांच्या मागे घाबरून लपून बसलेली त्यांना दिसली.
आईच्या ताब्यात दिले
तिला धीर देऊन तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप दिले. पाेलिसांनी दाेन तासांतच मुलीला शाेधून काढल्याने पाेलिसांचे आभार मानन्यात येत आहेत. पोलीस उपनिरीक्षक के.आर.भऊड, सहाय्यक फौजदार शिवाजी म्हात्रे, हवालदार रवि मुंडे, होमगार्ड आदेश पाटील यांच्या पथकाने कल्पेश ठाकूर यांच्या सहकार्याने शोध घेतला.