देवास: गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह मंगळवारी संध्याकाळी आढळून आले. देवास जिल्ह्यातील एका शेतातून संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह आढळले. पाच जणांची गळा आवळून हत्या झाली असून त्यांचे मृतदेह ८ ते १० फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आले. विशेष म्हणजे हा खड्डा आधीच खणण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षांच्या ममता, त्यांच्या दोन मुली (२१ वर्षांची रुपाली आणि १४ वर्षांची दिव्या) आणि त्यांच्या दोन चुलत बहिणी १३ मे रोजी घरातून बेपत्ता झाल्या. मृतांपैकी एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असेलला घर मालक आणि त्याच्या जवळच्या १२ साथीदारांनी पाच जणांची हत्या केली. या प्रकरणी मुख्य आरोपी सुरेंद्र आणि चार अन्य व्यक्तींना अटक करण्यात आली असून सात जणांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दहा फूट खड्डा खणल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कबरींमध्ये पाच मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडले. कोणत्याच मृतदेहावर कपडा नव्हता. आरोपींनी पाचही आरोपींचे कपडे जाळले होते. यासोबतच मृतहेल लवकर नष्ट करण्यासाठी मीठ आणि यूरियाचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी सुरेंद्र चौहानसह सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी शिवपाल सिंह यांनी दिली. चौहान यांनी हत्येची योजना आखली आणि इतर ५ जणांनी मृतदेह पुरण्यासाठी त्यांना खड्डा खणण्यास मदत केली.
'कुटुंबियांनी पाच जण बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मारेकऱ्यांनी सोशल मीडियावर महिलेच्या मोठ्या मुलीच्या आईडीवरून मेसेज पोस्ट करून पोलिसांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले. रुपालीनं आपल्या इच्छेनं लग्न केलं असून लहान बहिण, दोन्ही चुलत बहिणी आणि आई आपल्यासोबत सुरक्षित असल्याचा दावा मेसेजमधून करण्यात आला होता,' अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी रुपालीचा मेसेज पाहून तिचा मोबाईल नंबर ट्रॅक केला. तिच्या कॉल डिटेल्समधून ती घरमालकाच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी घरमालकाची चौकशी केली. मात्र आपले रुपालीशी संबंध नसल्याचं त्यानं सांगितलं. घरमालक १३ मे रोजी पाच व्यक्तींच्या सातत्यानं संपर्कात असल्याचं पोलिसांना कॉल रेकॉर्डवरून समजलं. घरमालक सुरेंद्र आणि रुपाली रिलेशनशिपमध्ये होते. मात्र सुरेंद्र एका अन्य महिलेसोबत लग्न करणार होता. त्याची माहिती मिळताच रुपाली नाराज झाली. तिनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. ते पाहून सुरेंद्र संतापला आणि त्यानं रुपालीसह तिच्या कुटुंबातील आणखी ४ जणांची हत्या केली.