पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयाकाविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसापूर्वीच या समन्वयकाविरुद्ध एका अॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल झाला आहे.
सुनिल मधुकर जगताप (वय ५२, रा. मुंढवा), कोमलसिंग डोगरसिंग वाणी (वय ४५, रा. मुंढवा), राजेश काळुराम गायकवाड (वय ४३, रा. खराडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खराडी परिसरातील एका ४५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.
विकसनासाठी दिलेल्या जमिनीबाबत फिर्यादी महिलेचे काही बांधकाम व्यावसायिकाबरोबर २००७ पासून वाद सुरु आहे. या दरम्यान न्यायालयात त्यांची सुनिल जगताप याच्याशी ओळख झाली. या ओळखीतून जगताप याने हा वाद सोडवून जागा विकसित करुन देतो, असे सांगितले होते.परंतु, त्याला या महिलेच्या पतीने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्याने या महिलेला फोन करुन एका बांधकाम व्यावसायिकाकडून तुमची जागा विकसित करुन देतो, असे सांगून त्यांना सोमवार पेठेत एका ठिकाणी भेटायला बोलावले. त्या ठिकाणी त्याने या महिलेवर बलात्कार केला. हा प्रकार २०१६ मध्ये घडला होता. त्यानंतर त्याने या महिलेला तुझा व्हिडिओ काढला असल्याचे सांगून पतीला जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला.
फिर्यादी व त्यांच्या पतीने लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी भोजन केंद्र सुरु केले होते. १० जून रोजी तेथे आरोपी कोमलसिंग वाणी याने येऊन त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्याकडून रोकड घेऊन त्यांची फसवणूक केली होती. ही सर्व बाब त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर चर्चा करुन पोलिसांकडे तक्रार दिली आहे.