पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांचा भाऊ मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली. ते अमेरिकेला पळून जाण्याच्या तयारीत असताना ही अटकेची कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून पाेलीस त्यांचा शाेध घेत हाेते. त्यांच्याविराेधात लुक आऊट नाेटीस सुद्धा काढण्यात आली हाेती. आज मकरंद कुलकर्णी यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकणी डीएसके दांपत्य अटकेत आहेत. त्यांना पुणे पाेलिसांनी दिल्ली येथून अटक केली हाेती. २५०० हून अधिक गुंतवणुकदारांची २३० काेटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या नातेवाईकांविराेधात शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. डीएसकेंचे भाऊ मकरंद हे डीएसके यांच्या कंपनीचे प्रवर्तक आहेत. पाेलीस त्यांचा अनेक महिन्यांपासून शाेध घेत हाेते. त्यांचा पत्ता लागत नसल्याने त्यांच्या विराेधात लुटआऊट नाेटीस काढण्यात आली हाेती. मकरंद कुलकर्णी हे अमेरिकेला पळून जाण्याच्या तयारीत असून ते मुंबई विमानतळावर येण्याची माहिती पाेलिसांनी लागली हाेती.