मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर २९ जुलैला सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 08:25 PM2019-06-13T20:25:10+5:302019-06-13T20:27:11+5:30
प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी या आरोपींची दोषमुक्तीसाठी हायकोर्टात याचिका दाखल
मुंबई - भोपाळची नवी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर हिने मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील खटल्यास अनुपस्थित राहण्याची परवानगी मिळावी याकरिता केलेला अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळला होता. मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी या आरोपींची दोषमुक्तीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेवर २९ जुलैला सुनावणी होणार आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा तरी सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित रहाण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयाने दिले होते. या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांचा देखील समावेश आहे. आरोपी सुनावणीसाठी गैरहजर असल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संसदेत काही महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडायच्या आहेत. त्यासाठी आपण खटल्याला उपस्थित राहू शकत नाही, असा अर्ज ठाकूर यांनी विशेष न्यायालयात केला होता. मात्र, न्या. व्ही. पडसळकर यांनी अशा प्रकारची कारणे वारंवार चालवून घेऊ शकत नाही, असे म्हणत ठाकूरचा अर्ज फेटाळला होता.