मंदसौर : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात असलेल्या भाजी मार्केटमध्ये एकाला लसूण चोरी केल्याच्या आरोपावरून नग्न करून मारहाण केल्याची घडना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. या मारहाणीच्या व्हिडिओत जे गुन्हेगार दिसत आहेत, त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असे येथील पोलीस ठाण्याचे अधिकारी एस. एल बौसारी यांनी सांगितले.
दरम्यान, सोन्याचे दागदागिने, रोकड रक्कम चोरीच्या घटना नेहमीच ऐकण्यात येतात. पण आता चक्क चोरांनी आपला मोर्चा लसूण आणि कांद्याकडे वळवला आहे. लसूण आणि कांद्याचे दर वाढल्यानंतर देशातील अनेक भागातून अशा प्रकारच्या चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील आलमबागच्या मवैया भाजी मार्केटमध्ये एका दुकानातून जवळपास 160 किलो लसूण आणि 70 किलो कांद्याची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर दुकानदाराने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
याचप्रकारे पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे एका दुकान चोरी झाल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेत चोरट्यांनी दुकानातील 50 हजार रुपयांची लसूण, आल्लं आणि कांद्याची चोरी करुन पळ काढला. पण, दुकानातील रक्कम तशीच होती, तिला हात लावला नव्हता. याशिवाय, गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये शेतमालक झोपेत असताना शेतात असलेल्या कांदाचाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला लक्ष्य करीत तीस गोण्या कांद्याची चोरी करण्याच्या प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. मात्र, आवाजाने शेतकरी जागा झाल्यामुळे कांदे चोरीचा प्रयत्न फसला व चोरट्यांनी कांद्याच्या गोण्या फेकून देत तेथून पळ काढला होता.
(देश कांद्याच्या दरानं हैराण अन् अर्थमंत्री म्हणतात; मी फार कांदा, लसूण खात नाही)(सुकलेला लसूण टाकून देताय?; असं करू नका, फायदे वाचून व्हाल हैराण)(प्रमाणापेक्षा जास्त लसूण खाल्ल्याने 'या' समस्या उद्भवतात...)