मुंबई : मुलीची छेड काढल्याचा आरोप करत तरुणाला लुटल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी दुकलीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.कर्जत येथील रहिवासी असलेला २८ वर्षीय तक्रारदार तरुण मुलुंडमधील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून नोकरीवर आहे. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता काम उरकून तो बँकेच्या कामासाठी निघाले. येथीलच संतोषीमाता मंदिरालगत असलेल्या बसथांब्यावर बसची वाट पाहत उभे असताना दोन तरुण तेथे धडकले. त्यांनी त्याला सलीम भाईच्या मुलीला छेडले का, असे विचारले. मात्र, त्याने नकार दिला. तेव्हा, पुढे गर्दी जमली असून तेथे येऊन खरी परिस्थिती सांगण्याचा सल्ला त्याला देण्यात आला. त्याच्यासोबत काही अंतरावर चालत गेल्यानंतर तेथे आणखीन एक व्यक्ती आली. त्याने, तरुणाला गर्दीपुढे जाण्यापूर्वी दागिने काढून ठेवण्यास सांगितले. भीतीने तरुणानेही दागिने काढून ठेवून दिले. त्याच दरम्यान आरोपींनी त्याच्या दागिन्यावर हात साफ केला. त्यानंतर दोघेही पसार झाले.तरुणाने पुढे जात चौकशी करताच छेडाछेडीचा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे समजले. या प्रकाराने त्यालाही धक्का बसला. त्याने थेट मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
मुलीची छेड काढल्याचा आरोप करत मुलुंडमध्ये तरुणाला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 2:22 AM