मुंबई – भायखळा कारागृहामधील वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आज दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे.
या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून याच जेलमधील कैदी भाग्यश्री मांडवकरला पुन्हा कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. मात्र, कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी होऊ शकली नाही. 18 मार्चला होणाऱ्या पुढील सुनावणीतही मांडवकर यांचीच उलटतपासणी सुरू राहील. याच सरकारी साक्षीदारानं आरोपींनीच मंजुळा शेट्येला मृत्युपूर्वी बेदम मारहाण केल्याचं कोर्टात सांगितले होते.मुंबई सेशन्स कोर्टाच्या अतिरिक्त न्यायाधीश शायना पाटील यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मंजुळा शेट्ये प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं सहा जणांविरोधात आरोप निश्चित केलेत. कलम 302 नुसार हत्या करणे, कलम 120 ब नुसार हत्येचा कट रचणे, कलम 201 नुसार पुरावा नाहीसा करणे आणि कलम 501 नुसार मरेपर्यंत मारहाण करणे या कलमांखाली हे आरोप निश्चित करण्यात आलेत. कारागृह अधिक्षक मनीष पोखरकरसह महिला जेल पोलीस बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शितल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या 6 पोलिसांनी हेतूपरस्पर मंजुळाची हत्या केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.