नागपूरच्या मानकापूर हत्याकांडातील आरोपीला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:25 PM2020-01-13T22:25:32+5:302020-01-13T22:26:56+5:30
क्षुल्लक कारणावरून नातेवाईक तरुणाची हत्या करणारा आरोपी शेरा उर्फ विकी महतो (वय ४६) याला न्यायालयात हजर करून मानकापूर पोलिसांनी त्याची १६ जानेवारीपर्यंत कोठडी मिळवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्षुल्लक कारणावरून नातेवाईक तरुणाची हत्या करणारा आरोपी शेरा उर्फ विकी महतो (वय ४६) याला न्यायालयात हजर करून मानकापूर पोलिसांनी त्याची १६ जानेवारीपर्यंत कोठडी मिळवली. आरोपी शेराने रविवारी रात्री ८ च्या सुमारास त्याचा नातेवाईक आनंद ललित खरे (वय ४५) याची क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर चाकूने भोसकून हत्या केली होती.
झिंगाबाई टाकळीजवळच्या मराठी शाळेजवळ नाल्याच्या काठावर आनंद एका झोपडीत त्याची वृद्ध आई आणि १२ वर्षीय मुलासह राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तो संशयी आणि सणकी स्वभावाचा होता. छोट्या छोट्या कारणावरून वाद घालून लगेच भांडणावर येत असल्यामुळे आनंदचे आजुबाजुच्यांसोबत फारसे पटत नव्हते. त्याच्या याच स्वभावामुळे त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती. १२ वर्षांचा मुलगा आणि वृद्ध आईसोबत तो राहायचा. मोलमजुरी करून तो पोट भरत होता. रविवारी रात्री ९ च्या सुमारास तो बाहेरून घरी परतला. यावेळी त्याला घराजवळ शेरा बसून दिसला. त्यामुळे आनंदने त्याला ‘तू माझ्या घराजवळ कशासाठी बसला‘, असा प्रश्न केला. त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली. एकमेकांना मारहाण केल्यानंतर आनंद त्याच्या झोपड्यात गेला. त्याने आतून भाजी कापण्याचा सत्तूरसारखा चाकू आणला. त्याने शेरावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेराने आनंदच्या हातातील चाकू हिसकावून आनंदवरच सपासप घाव घातले. आरडाओरड ऐकल्यानंतर आनंदची आई आणि शेजारी धावले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आनंदला मेयोत नेले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच मानकापूरचे ठाणेदार वजिर शेख त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. तणाव निर्माण होत असल्याचे पाहून अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेण्यात आले. पोलीस उपायुक्त विनीता शाहू आणि सहायक आयुक्त रेखा भोवरे यांनीही मानकापूर ठाणे गाठले. रिना राजेश मातेलकर (वय ३५) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी शेराला पोलिसांनी अटक केली. सोमवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करून त्याची १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.
निराधार झाली आई अन् मुलगा
आनंदच्या हत्येमुळे त्याची वृद्ध आई आणि छोटा मुलगा निराधार झाला आहे. आनंद या दोघांचा एकमात्र आधार होता. त्याच्याचमुळे घरात चूल पेटायची. क्षुल्लक कारणावरून त्याची हत्या झाल्याने आजी-नातवावर उपासमारीची पाळी आली आहे.