Mansukh Hiren Case: तपास तात्काळ थांबवा, NIAकडे सोपवा; ठाणे सत्र न्यायालयाचे ATSला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 03:33 PM2021-03-24T15:33:14+5:302021-03-24T15:36:09+5:30
Mansukh Hiren Case: स्फोटकांनी भरलेल्या कारसोबतच आता मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासदेखील एनआयए करणार
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. चारच दिवसांपूर्वी गृह मंत्रालयानं व्यवसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासदेखील एनआयएकडे सोपवला. या प्रकरणाबद्दल एनआयएनं न्यायालयात काल धक्कादायक माहिती दिली होती. गृह मंत्रालयाची सूचना मिळून ३ दिवस उलटूनही महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं तपास हस्तांतरित केला नसल्याची माहिती एनआयएनं न्यायालयाला दिली होती. यानंतर आता ठाणे सत्र न्यायालयानं एटीएसला महत्त्वाचा आदेश दिला आहे.
आरोपींनी सिमकार्ड, सीसीटीव्ही नष्ट केले; ATS कडून आणखी अटक होण्याची शक्यता
मनसुख हिरेन हत्येचा तपास तात्काळा थांबवा आणि तो एनआयएला सोपवा, असे आदेश ठाणे सत्र न्यायालयाने एटीएसला दिले आहेत. त्यामुळे आता एटीएसला लगेचच मनसुख हिरेन प्रकरणातील पुरावे, कागदपत्रं एनआयएकडे हस्तांतरित करावी लागतील. विशेष म्हणजे कालच एटीएसनं पत्रकार परिषद घेत मनसुख हिरेन प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचल्याची माहिती दिली होती.
ठाणे: मनसुख हिरेन हत्येचा तपास एटीएसने तात्काळ थांबवून तपास एनआयएकडे सोपवण्याचे ठाणे सत्र न्यायालयाचे आदेश pic.twitter.com/xh8Nc5WJoz
— Lokmat (@MiLOKMAT) March 24, 2021
या प्रकरणात एटीएसने पाळत ठेवून नरेश रमणीकलाल गोर आणि विनायक बाळासाहेब शिंदे यांना अटक केली असून विनायक शिंदेने मनसुख यांची हत्या घडवून आणली असल्याची माहिती एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी माहिती दिली. एटीएस मनसुख यांच्या हत्येच्या मुळाशी पोहोचली असून या गुन्ह्यात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता सिंग यांनी वर्तवली होती.
‘एटीएस’ला हवा सचिन वाझेचा ताबा; एनआयए कोर्टात केली मागणी
८ मार्च रोजी सचिन वाझे यांचे एटीएसने जबाब नोंद केले असता त्यांनी मी मनसुख यांना ओळखत नसून मला स्कॉर्पिओबद्दल माहिती नाही असे सांगितले. मात्र, मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी सचिन वाझे यांच्यावरवर संशयाचे बोट दाखवल्याने आम्ही गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. याप्रकरणी अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून काही साक्षीदार कोर्टात सीआरपीसी १६४ अन्वये साक्ष देण्यास तयार आहे. मुख्य आरोपी सचिन वाझे यांचा ट्रान्सीट रिमांडला कोर्टाकडून परवानगी मिळाली असून त्यांची NIA कोठडी २५ मार्चला संपणार आहे. त्यामुळे वाझे यांच्या कोठडीची २५ मार्चला कोर्टात एटीएस अपील दाखल करणार असल्याची माहिती एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी दिली.