मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेचा ताबा एटीएस लवकरच घेणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत असलेल्या वाझेची २५ तारखेला कोठडी संपत असल्याने त्याचा ताबा मिळावा यासाठी एटीएसने एनआयए कोर्टात मागणी केली आहे. ठाणे दंडाधिकाऱ्यांकडून त्याचे ट्रान्स्फर वाॅरंटही घेतले आहे. वाझेच्या ताब्यानंतर हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे एटीएस प्रमुख जयजीत सिंह यांनी सांगितले.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात वाझे एनआयएच्या कोठडीत आहे. मनसुख यांच्या हत्या प्रकरणात वाझे आणि त्याच्या कटात सहभागी असलेल्या सहकाऱ्यांनी कार्यालय, परिसर तसेच अनेक मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. वाझेच्या चौकशीतून यामागील हेतू स्पष्ट होईल, असे सिंह यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी संशयितांकडे चौकशी सुरू असून, आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. वाझेचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे महत्त्वाचे पुरावेही एटीएसच्या हाती लागले आहेत.
दमण येथून जप्त केलेल्या कारमध्ये मिळाल्या २ बॅगाठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एक व्होल्वो कार सोमवारी दमण येथून जप्त केली. या कारमधून दोन बॅगा पोलिसांनी हस्तगत केल्या. ही कार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे वापरत असल्याचा संशय असून तिची मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने मंगळवारी तपासणी केली. या कारची मालकी किंवा सध्या ती कोण वापरत होते, याची माहिती ‘एटीएस’कडून देण्यात न आल्यामुळे याबाबतचा संभ्रम वाढला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील अँटिलिया इमारतीजवळ मिळालेल्या स्फोटके असलेल्या कारप्रकरणी अटक केलेले मुंबईचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या वापरातील पाच वेगवेगळ्या कार आतापर्यंत जप्त केल्या आहेत. या प्रत्येक कारचा नेमका वापर कशासाठी झाला, त्याचा मनसुख हत्येशी नेमका काय संबंध आहे, याचा तपास एनआयएकडून सध्या सुरू आहे.