ठाणे : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपासही राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाऊ नये म्हणून हालचालींना वेग आला आहे. या खुनातील पाळेमुळे शोधून काढण्याचे आदेश एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी रविवारी एटीएसच्या पथकाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या पार्श्वभूमीवर या खुनाच्या कटातील दोन आरोपींना अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने रविवारी अटक केली. एकीकडे एनआयएने अंटिलियाजवळ मिळालेल्या स्फोटकांच्या कारच्या गुन्ह्यात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. त्यापाठोपाठ या प्रकरणामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची राज्य सरकारला उचलबांगडी करावी लागली. त्यानंतर मनसुख यांच्या हत्येत वाझे यांचा सहभाग होता किंवा कसे, याचा तपास एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून सुरू झाला होता. त्याचा घटनाक्रम एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेण्यास सुरुवात केली होती.
इकडे एटीएसच्या अधिकाऱ्यांकडे काहीच हाती लागत नसल्याने स्फोटकांच्या तपासाबरोबरच हाही तपास एनआयएकडे जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तोपर्यंत एनआयए हा तपास घेत असल्याचे वृत्तही आले. अखेर राज्याचे एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये या प्रकरणाचा कसून तपास करण्याचे आदेश देण्यात आले. गेली तीन दिवस हे अधिकारी ठाण्यात तळ ठोकून होते. अखेर या प्रकरणाचा काही अंशी छडा लावण्यात यश आले. त्यातील दोघांना रविवारी अटक करण्यात आली. आता हा तपास काही प्रमाणातच बाकी असल्यामुळे तो एटीएसकडेच ठेवण्यात यावा, एनआयएला यासंदर्भात लागणारे कोणतेही सहकार्य एटीएसकडून केले जाईल, असेही बोलले जाते.
‘अतिसंवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात एटीएसच्या पथकाला यश आले आहे. एटीएसच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून सॅल्यूट आहे. आतापर्यंतच्या पोलीस सेवेच्या करिअरमधील सर्वात अवघड केसपैकी ही एक केस आहे.’ - शिवदीप लांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, एटीएस