मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी सापडलेली गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू (mansukh hiren death Case) प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या स्फोटक गाडीच्या गुन्ह्याचा तपास करताना सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. मात्र, या गाडीसोबत भाजप (BJP Leader) नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin sawant) यांनी केला आहे. (mansukh hiren death case : photo of bjp leader with mercedes car, sachin sawants allegation)
यासंदर्भात सचिन सावंत यांनी पुराव्यानिशी फोटो ट्विट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच, यावरून या प्रकरणाला आता वेगळे वळण येण्याची शक्यता असून पुन्हा राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसून येत आहे. मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्या दिवशी हिरेन यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला. त्याच मर्सिडीज कारसोबत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके (Deven Hemant Shelke) यांचा फोटो आहे.
याचबरोबर, देवेन शेळके यांची 17 ऑक्टोबर 2020 रोजी भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती. याबाबतचे नियुक्ती पत्र सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. तसेच, मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी याच गाडीतून प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.
दरम्यान, सचिन वाझे यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून एनआयएच्या पथकाने मंगळवारी रात्री एका ठिकाणाहून काळ्या रंगाची मर्सिडीज (एमएच १८-बी आर-९०९५) जप्त केली. त्याच्या डिक्कीमध्ये एका पिशवीत चेक्सचा शर्ट, पाच लाखांची रोकड, नोटा मोजणारे मशीन, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे. ही गाडी वाझे वापरीत होते, त्याचप्रमाणे जी नंबरप्लेट आहे, ती स्कॉर्पिओला वापरण्यात आली होती. पीपीई किट वापरणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर असाच लाल रंगाचा चेक्स शर्ट असल्याचे फुटेजमधून स्पष्ट दिसत होते.
याचबरोबर जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओमध्ये जी नंबरप्लेट वापरली होती, ती त्यामध्ये सापडली आहे. या गाडीचा वापर वाझे करीत होते. त्यांनी ती कोठून घेतली, त्याचा वापर ते कशासाठी करीत होते, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे महानिरीक्षक शुक्ला यांनी सांगितले. दरम्यान, ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांनी संशयास्पद मृत्यूपूर्वी याच गाडीतून प्रवास केला होता, असे समजते.
जानेवारीत केली मर्सिडीजची ऑनलाइन विक्रीमर्सिडीजचे मूळ मालक धुळ्यातील सारांश भावसार आहेत. जानेवारीत त्यांनी गाडीची ऑनलाइन विक्री केली होती. ‘कार २४’ या वेबसाईटवरून त्याचा व्यवहार केला होता. त्यामुळे कार विकत घेणाऱ्या दुसऱ्या पार्टीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. तपास यंत्रणेने आपल्याशी संपर्क साधलेला नाही, त्यांनी विचारणा केल्यानंतर आपण सर्व माहिती देऊ, असे भावसारने एका वृत्तवहिनीला सांगितले.
(सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज जप्त पाच लाखांची रोकड हस्तगत)