लातूर : पुणे, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतून माेटारसायकली पळवून त्या दाेन-चार हजारात विक्री करणाऱ्या परळी वैजनाथ येथील अखिल महेबूब शेख याला लातूर पाेलिसांनी पकडलं. त्याच्याकडून १९ दुचाकी जप्त केल्या असून, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पाेलिसांच्या हाती लागला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी घडलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी पाेलीस पथकाला आदेश दिले हाेते. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने आराेपीचा शाेध सुरु केला. तर २८ मार्च राेजी लातुरातील विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल केला हाेता. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे परळी वैजनाथ येथील अखिल महेबूब शेख (३४) याला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्याची अधिक चाैकशी केली असता, एमआयटी महाविद्यालयाच्या पार्किंगमधील मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. अधिक चाैकशी करत खाक्या दाखवताच लातूर शहर, उदगीर, माळाकोळी (ता. लाेहा, जि. नांदेड), अंबाजोगाई, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, शिक्रापूर, पुणे येथून मोटरसायकली चाेरल्याचे त्याने सांगितले. चाेरीतील १९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मानूला, पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, सहायक फौजदार बुड्डे-पाटील, वाहिद शेख, रामचंद्र ढगे, पोलीस अमलदार मुन्ना पठाण, संजय कांबळे, रामलिंग शिंदे, दयानंद सारोळे, महेश पारडे, विनोद चलवाड, खंडू कलकत्ते, रमेश नामदास, अशाेक नलवाड, नारायण शिंदे यांचा यांच्या पथकाने केली.
दाेन-चार हजारांत विक्री...लातूर, औरंगाबाद, पुणे, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतून पळविण्यात आलेल्या माेटारसायकली केवळ दाेन ते चार हजार रुपयांत विक्री करण्यात आल्याची माहिती समाेर आली आहे. केवळ खर्चा-पाण्यासाठी अखिल शेख याने या माेटारसायकली चाेरल्याचे पाेलिसांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून ताे एकटाच माेटारसायकल चाेरी करत होता.