लग्नाच्या मध्यरात्री नवरीनं ‘असा’ प्रताप केला की नवरदेवासह कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठलं अन्....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 11:52 AM2021-07-30T11:52:10+5:302021-07-30T11:53:21+5:30
या प्रकरणी ५ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील भिंडच्या गोरमी परिसरातून एक नववधू लग्नाच्या रात्रीच तिच्या सासरमधून पळून गेल्याची घटना घडली आहे. नवरदेवाने लग्नासाठी ९० हजार रुपये नवरीकडच्या कुटुंबीयांना दिले होते. त्यानंतर लग्न झालं आणि त्याच रात्री नवरी घराच्या छतावरून उडी मारून पळून गेल्याने सगळ्यांना धक्का बसला. फसवणुकीला बळी पडलेल्या नवरदेवानं थेट पोलीस ठाणं गाठलं.
या प्रकरणी ५ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरमी परिसरात राहणाऱ्या दिव्यांग सोनू जैनचं लग्न झालं नव्हतं. सोनू जैनच्या ओळखीचा ग्वालियर रहिवासी उदल खटीकने त्याला सांगितले की, मी तुझं लग्न लावेन परंतु त्या बदल्यात १ लाख रुपये द्यायला लागतील. सोनू जैननं ९० हजारात सौदा केला. मंगळवारी उदल खटीक, अनिता रत्नाकर नावाच्या महिलेला घेऊन गोरमी इथं पोहचला.
अनिता रत्नाकरसोबत अरूण खटीक आणि जितेंद्र रत्नाकर यांनाही उदल खटीकनं गोरमीला आणलं. याठिकाणी सोनू जैनचं लग्न अनितासोबत सर्व कुटुंबीयांच्या साक्षीने करण्यात आलं. अनिताला मंगळसूत्र घातलं. सोनूच्या घरच्यांनी नव दाम्पत्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर सर्वजण आपापल्या रुममध्ये झोपण्यासाठी निघून गेले. अनितासोबत आलेले जितेंद्र रत्नाकर, अरुण खटीक दोघंही रुमच्या बाहेर झोपण्यासाठी गेले तर अनिताने तब्येत खराब असल्याचा बहाणा करत टेरेसवर गेली होती.
मध्यरात्री जेव्हा घरच्यांना जाग आली तेव्हा सूनेचा शोध सुरू झाला परंतु ती कुठेच दिसली नाही. अनिता टेरेसवरून उडी मारून पळून गेली परंतु रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या हाती ती सापडली. त्यानंतर नवरदेव सोनूने गोरमी पोलीस ठाण्यात पोहचून त्याच्यासोबत फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोनू जैनच्या तक्रारीवरून उदय खटीक, जितेंद्र रत्नाकर, अरुण खटीक आणि अनिता रत्नाकर यांच्यासह आणखी एकावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. त्याचसोबत अटक केलेल्या ३ आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.