डोंबिवली : लॉकडाऊनमध्ये बंद कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर चोऱ्या वाढल्या होत्या. यातील एका चोरीच्या प्रकरणातील चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले होते. परंतु, चोराने मास्क घातल्याने त्याची ओळख पटत नव्हती. दरम्यान, एका तक्रारदाराने सोशल मीडियावर चोरट्याचे फुटेज व्हायरल केले. या व्हायरल पोस्टमुळे चोरट्याची ओळख पटली आणि त्याला पकडण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले.
योगेश पाटकर यांच्या पूर्वेकडील टंडन रोडला असलेल्या कॉमर्स सेंटरमध्ये पेसमेकर डान्स अकॅडमी आहे. त्याठिकाणी चोरी करून चोरट्याने ५० हजारांचा प्रोजेक्टर आणि आठ हजारांचा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना ९ ऑगस्टला सकाळी सव्वादहाच्या सुमारास उघडकीस आली होती. याप्रकरणी पाटकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या अकॅडमीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरट्याच्या हालचाली कैद झाल्या होत्या. या फुटेजमध्ये २५ ते ३० वयोगटांतील सडपातळ शरीरयष्टीचा चोरटा अकॅडमीमधील प्रोजेक्टर आणि लॅपटॉप निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत गुंडाळून मेन गेटमधून जाताना दिसून आला होता. शहरात चार ते पाच ठिकाणी अशाच प्रकारे चोऱ्या झाल्या होत्या आणि त्यात एकच चोरटा सक्रिय असल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले होते.
परंतु, चोराने मास्क घातल्याने पोलिसांना त्याची ओळख पटविता येत नव्हती. दरम्यान, डान्स अकॅडमी चालविणारे पाटकर यांनी त्यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केले होते. ती व्हायरल पोस्ट एका तरुणाने बघितली आणि पाटकर यांच्याशी संपर्क साधून सीसीटीव्ही फुुटेजमधील व्यक्तीला ओळखत असल्याचे सांगितले. त्यानुसार, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
अनलॉकमध्ये ट्रेनने यायचा चोरी करायला
कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुन यांच्या पथकाने खोणी येथील पाइपलाइन रोड येथे सापळा लावून २८ नोव्हेंबरला वांगणीला राहणाऱ्या रोशन बाळ जाधव याला अटक केली. nतो डिसेंबर २०१९ मध्ये जेलमधून बाहेर आला होता. अनलॉकमध्ये ट्रेन सुरू झाल्यावर रोशन दररोज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली गाठायचा. सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान चोरी करून परत निघून जायचा.