नरेश डोंगरेनागपूर - सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या आणि राजकीय वातावरण तप्त करणाऱ्या महापौर संदीप जोशी गोळीबार प्रकरणाचा तपास थंडगार झाला की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. १२ महिने झाले तरी तपास यंत्रणेला गोळीबाराचा गुंता सोडविण्यात यश आलेले नाही. दरम्यान, या प्रकरणातील तपास करणाऱ्या सीआयडी अधिकाऱ्याची बदली झाल्याने गोळीबाराचा तपास पुन्हा एका नव्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.
१७ डिसेंबर २०१९ ला ही गोळीबाराची घटना घडली होती. लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे महापाैर जोशी त्यांचे कुटुंबीय आणि काही मित्रांसह नागपूरच्या आऊटर रिंग रोडवरील रसरंजन धाब्यावर जेवायला गेले होते. जेवण करून दोन मित्रासह कारमध्ये बसून येत असताना एम्प्रेस पॅलेसजवळ मागून बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जोशी यांच्या फॉर्च्यूनर कारवर ३ गोळ्या झाडल्या. एक गोळी जोशी यांच्या बाजूच्या काचेतून कारच्या आत शिरली. तर दुसरी गोळी कारच्या मागील सीटमध्ये शिरली. तिसरी गोळी कारच्या मागच्या बाजूला लागली. कुणालाही गोळी लागली नाही. मात्र, नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने आणि राज्य सरकारसोबतच सुरक्षा यंत्रणेचा संपूर्ण फौजफाटा नागपुरात असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांकडून या प्रकरणाची विस्तृत माहिती घेताना गोळीबार करणारांना तात्काळ शोधून काढण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, गन्हे शाखेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी स्वता सूक्ष्म नजर ठेवून हल्लेखोरांना शोधण्यासाठी प्रयत्न केले.सुत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तब्बल दोन लाख मोबाईल कॉल्सची तपासणी केली. २०० पेक्षा जास्त गुन्हेगारांना विचारपूस केली. महापालिका, जोशी यांचे निवासस्थान ते घटनास्थळ परिसर अशा ठिकठिकाणच्या शेकडो सीसीटीव्हीचे फुटेजही तपासले. या घटनेपूर्वी जोशी यांना १२ दिवसात पत्राच्या माध्यमातून दोन धमक्या मिळाल्या होत्या. ते पत्र टाकणाऱ्या संशयीतांचीही पोलिसांनी कसून तपासणी केली. चौकशीच्या या धांडोळ्यात पोलिसांच्या हाती काही चक्रावून टाकणारे पैलूही लागले. मात्र, ते उघड करण्यासारखे नव्हते. या पार्श्वभूमीवर, जुलै २०१९ मध्ये हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला.१२ महिने झाले, चौकशी सुरूचसीआयडीचे स्थानिक युनिट गेल्या पाच महिन्यांपासून तपास करीत आहेत. या दरम्यान, तपास अधिकारी मोहिते यांची बाहेरगावी बदली झाल्याने आता हा तपास सूर्यवंशी नामक अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.दोन दिवसांनंतर या गोळीबाराला १ वर्ष पूर्ण होईल. आजपर्यंत या प्रकरणातील आरोपीचा छडा लागलेला नाही. तपासाचे स्टेटस काय आहे, ते जाणून घेण्यासाठी लोकमतने सीआयडीचे अतिरक्त महासंचालक अतुल कुळकर्णी यांच्याकडे संपर्क साधला. मात्र, वैद्यकीय कारणांमुळे ते बोलू शकले नाही. तर, सीआयडी एसपी शिवणकर यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी या संबंधाने बोलण्याचे टाळले.