कंटेनरमधून ७६ लाखांची औषधे लांबविली, शिरपूरची घटना
By देवेंद्र पाठक | Published: February 22, 2023 04:53 PM2023-02-22T16:53:59+5:302023-02-22T16:54:14+5:30
पोलिसात गुन्हा दाखल, तपास सुरू
धुळे: शिरपूर येथील हॉटेल तिरंगा परिसरात उभ्या कंटेनरमधून चोरट्याने ७६ लाखांची औषधे लांबविली. या प्रकरणी शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक आसुकुमार रामजित कनोजिया (वय ३४, रा. अमावा कला, पोस्ट पट्टी नरेंद्रपूर तहसील, शहागंज जनपत, उत्तर प्रदेश) याने शिरपूर शहर पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याने त्याच्या ताब्यातील कंटेनर ४ जानेवारी रोजी तिरंगा हाॅटेल येथे उभा केला होता. कोणीही नसल्याची संधी साधत पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी कंटेनरचे रबरी सील व कुलूप तोडून विविध औषधीचे तब्बल ५२ बॉक्स लंपास केले. लंपास केलेल्या औषधांची किंमत ७६ लाख ५५ हजार २२४ रुपये इतकी आहे. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर या प्रकरणी मंगळवारी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक किरण बाऱ्हे करीत आहेत.