मुंबई - जीके सिक्युरिटीज् सर्व्हिसेस या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या महिला सुरक्षा रक्षकास अश्लील भाषा वापरून लज्जा उत्पन्न केल्याप्रकरणी पीडित महिलेने सहकारी असलेल्या सुरक्षा रक्षकाविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप गुन्ह्याचा तपस सुरु असून आरोपी विजय उबाळेला अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.
३३ वर्षीय महिला सुरक्षा रक्षक जीके सिक्युरिटीज् सर्व्हिसेस कंपनीमार्फत अंधेरी येथील एका ठिकाणी कार्यरत होती असताना तेथे सहकारी असलेल्या सुरक्षा रक्षक विजय उबाळे याने अश्लील आणि अपमानास्पद फोनवरून बातचीत केली. पीडित महिला २१ मे सहकारी असलेल्या इंजिनिअरसोबत जेवण करण्यास गेली होती. त्यानंतर जेवण करून आल्यानंतर या महिलेला लँडलाईनवर फोन करून विजयने अश्लील भाषा वापरून इंजिनिअर आणि त्या महिलेच्या काही संबंध असल्याबाबत बातचीत केली. तसेच महिलेला लज्जा उत्पन्न करणारी भाषा वापरली होती. अशा प्रकारे कामाच्या स्थळी महिलेला फोनद्वारे विजयने नाहक त्रास दिला होता. त्यानंतर पोलिसात गेल्यानंतर होणाऱ्या बदनामीला घाबरून पीडित महिला गप्प बसली. मात्र, #MeToo मोहिमेमुळे पाठबळ आणि धीर मिळाल्याचे सांगत पीडित महिलेने खेरवाडी पोलीस ठाण्यात २७ ऑक्टोबर रोजी भा. दं. वि. कलम ५०० आणि ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेतला असून गुन्ह्याची चौकशी सुरु आहे.