विनासोडत म्हाडाचे घर देतो सांगून कोटी रुपये उकळणाऱ्या म्हाडा अधिकाऱ्याला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 07:47 PM2018-12-18T19:47:39+5:302018-12-18T19:48:32+5:30
या प्रकरणी खार पोलिसांनी आज टिळक नगर येथील राहत्या घरातून म्हाडात समाज विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या युवराज पाटील सावंतला बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई - म्हाडाचे स्वस्तात घर मिळावे असं अनेकांचं स्वप्न असतं. तसंच स्वप्न होतं योगेश अहिर यांचं देखील. योगेश अहिर यांच्यासह अनेकांना २००९ च्या म्हाडा सोडतीतून विनासोबत विशेष अधिकारी आरक्षणातून म्हाडाचं घर मिळवून देतो असं सांगून म्हाडाचा अधिकारी युवराज पाटील सावंत आणि त्याच्या साथीदारांनी २ कोटी २२ लाख रुपये उकळले होते. या प्रकरणी खार पोलिसांनी आज टिळक नगर येथील राहत्या घरातून म्हाडात समाज विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या युवराज पाटील सावंतला बेड्या ठोकल्या आहेत.
२००९ साली म्हाडाची स्वस्त किंमतीत घरांची सोडत निघाली होती. या सोडतीतील विनासोडत घर मिळवून देतो असं सांगून तक्रारदार योगेश अहिर यांच्यासह अनेकांचे कोटी रुपये विद्याधर उर्फ बबन पाल, सुनीता तुपसौंदर्य, रमेश चव्हाण आणि युवराज सावंत पाटील यांनी संगनमताने लुबाडले होते. त्यानंतर २७ नोव्हेंबर २०१४ साली तक्रारदार योगेश अहिर यांच्यासह अनेकांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर तपासादरम्यान खार पोलिसांनी विद्याधर उर्फ बबन पाल, सुनीता तुपसौंदर्य, रमेश चव्हाण, जितेंद्र गाडिया यांना अटक केली. नंतर या चौघांची जामिनावर मुक्तता झाली. मात्र, तब्बल चार वर्ष म्हाडाचा अधिकारी असलेला युवराज सावंत पाटील मात्र पोलीस तपासात फरार होता. या अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंध विभागाद्वारे चौकशी देखील सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान तक्रारदार योगेश अहिर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी फरार आरोपी असलेल्या युवराज सावंत - पाटीलला टिळक नगर येथील राहत्या घरातून आज सायंकाळी अटक करण्यात आली असल्याची माहिती खार पोलीस ठाण्याचे संजय मोरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. उद्या या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.