घर सांभाळण्यासाठी मुलींना जुंपले कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 07:07 AM2020-09-21T07:07:50+5:302020-09-21T07:15:05+5:30
शिक्षण अर्ध्यावरच : कोरोना साथीचा फटका; भारतासह अन्य आशियाई देशांमधील विदारक चित्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतासह आशियाई देशांतल्या ग्रामीण भागात कोरोना साथीमुळे गरीब घरांतील लाखो मुलींना शिक्षण अर्धवट सोडून पैसे कमावण्यासाठी कामाला जुंपून घेण्याची वेळ आली आहे. ‘रूम टू रिड’ या संस्थेने भारतासह काही देशांमध्ये यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
भारत, बांगलादेश, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका अशा अनेक देशांतील सुमारे २८ हजार मुलींची या सर्वेक्षणासाठी मते जाणून घेण्यात आली. रुढीप्रियतेमुळे या देशांत आधीच मुलींच्या शिक्षणाबाबत तितकीशी आस्था दिसून येत नाही. कोरोना साथीमुळे अनेक देशांतील शाळा सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळांनी आॅनलाइनद्वारे शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र आशियाई देशांतल्या ग्रामीण भागात ज्या गरीब मुलींकडे इंटरनेट तसेच मोबाइलची सुविधा नाही त्यांचे तर शिक्षणच थांबले आहे. शाळा बंद झाल्याने त्या मुलींचे तेथून नाव काढून त्यांना घरकामाला जुंपण्यात येत आहे.
समिती आज चौकशी करणार
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सोमवारी जिल्हा बालकल्याण समिती उपस्थित राहणार आहे. त्या वेळी कागदपत्रांची तपासणी करून मुलाचा ताबा देणे तसेच गुन्हा नोंद करण्याबाबत कार्यवाही होणार आहे.
रूढीवादी विचारांचा अद्यापही पगडा
‘रूम टू रिड’ या संस्थेचे संस्थापक जॉन वूड यांनी या पाहणीनंतर सांगितले की, जेव्हा पालकांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही, तेव्हा साधारणपणे ते मुलांना शिकू देतात व मुलींना शिक्षण अर्धवट सोडायला लावतात. विकसनशील देशांमध्ये रुजलेले रुढीवादी विचार तसेच गरीब कुटुंबांची आर्थिक ओढाताण यामुळे मुलींच्या शिक्षणावर सर्वात आधी गदा येते. कोरोना साथीच्या काळात काही देशांमध्ये शालेय शिक्षणाची घडी विस्कटली आहे. आॅनलाइन शिक्षण दिले जात असले, तरी त्यासाठी साधने सर्वांकडेच नसल्याने अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणाला पारखे होत आहेत. त्यात मुलींचे प्रमाण मोठे आहे.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २८ हजार मुलींपैकी ४२ टक्के मुलींच्या कुटुंबांचे उत्पन्न कोरोना साथीमुळे खालावलेले आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी मुली शिक्षण अर्धवट सोडून पैसे कमाविण्यासाठी छोटेमोठे काम करत आहेत. या सर्वेक्षणातील दर दोनपैकी एक मुलगी शिक्षण अर्धवट सोडण्याची शक्यता आहे.