अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार; आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:54 PM2018-08-18T13:54:34+5:302018-08-18T13:55:19+5:30
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणासह त्याला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या अन्य चार जणांना सिडको पोलिसांनी अटक केली.
औरंगाबाद : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणासह त्याला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या अन्य चार जणांना सिडको पोलिसांनी अटक केली.
मधुसूदन बाजीराव राठोड (२०, रा. आविष्कार कॉलनी, सिडको) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात आरोपीसह त्याला मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील बाजीराव राठोड, मित्र व्यंकटेश पाटील, सुमित मोकळे आणि एका मुलीला अटक केली आहे. याविषयी सिडको पोलिसांनी सांगितले की, सिडको परिसरातील १७ वर्षीय मुलगी आणि आरोपी मधुसूदन यांच्यात मैत्री होती. १२ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून जकातनाका येथे बोलावले.
त्यानंतर तेथून तो तिला मोटारसायकलने क्रांती चौक परिसरात घेऊन गेला. तेथे त्याने त्याचा मित्र व्यंकटेश पाटीलला बोलावले आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी व्यवस्था करण्याचे सांगितले. व्यंकटेशने त्याचा मित्र सुमित मोकळेला ही बाब सांगितली. सुमितने त्यांना भावसिंगपुरा येथे बोलावल्याने तिघे भावसिंगपुरा चौकात गेले. तेथे सुमितने त्याच्या मैत्रिणीच्या खोलीवर नेले. मैत्रिणीलासांगून त्यांनी मधुसूदन आणि पीडितेची मुक्कामाची व्यवस्था केली. तेथे मुक्कामी असताना आरोपीने पीडितेवर अत्याचार केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास व्यंकटेशने त्यांना पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिले. दरम्यान, १२ रोजी रात्रीच ही बाब पीडितेच्या वडिलांना समजताच त्यांनी आरोपीच्या वडिलांचे घर गाठले तेव्हा त्याने १३ रोजी सकाळी ११ पर्यंत तुमची मुलगी घरी येईल, तुम्ही पोलिसांत तक्रार करू नका, असे सांगितले; मात्र १३ रोजी दुपारी २ पर्यंत पीडिता न आल्याने पीडितेच्या नातेवाईकांनी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.
पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक झुंजारे, कर्मचारी निंभोरे, कदम आणि डोंगरे यांनी तपास करून आरोपींना शोधून काढले. आरोपीला पुण्याहून औरंगाबादला येण्यास भाग पाडले आणि पीडितेची मुक्तता केली. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीअंती आणि जबाबानंतर आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला.