कल्याण - पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरातून बेपत्ता झालेला अल्पवयीन मुलगा अजय बाळू सोनवणे (१५) हा पालघर जिल्हयातील खोडाळा येथे बाजारपेठ पोलिसांना सापडला. अजयला पोलिसांनी त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले.
वीटभटटीवर मजुरी करुन उदरनिर्वाह करणा-या बाळू सोनवणे यांचा मुलगा असलेला अजय हा जन्मत: मूकबधीर आहे. २८ सप्टेंबरच्या रात्री चुलत भावासोबत खेळणा-या अजयने वडिलांना पाहताच तिथून पळ काढला. त्यानंतर घरी परत न आल्याने त्याच्या वडिलांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अजय हा मूकबधीर असल्याने त्याला शोधणे पोलिसांसमोर आव्हान होते. म्हणून पोलिसांनी अजयचे छायाचित्राचे पोस्टर ठाणे आणि रायगड जिल्हयातील सर्व रेल्वे स्थानक तसेच, इतर महत्त्वाच्या ठिकाणी लावले. सदरचे पोस्टर दिलीप भिमा डहाळे या होमगार्डने पाहिल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात रविवारी फोन केला. सदरचा मुलगा पालघर जिल्ह्यातील खोडाळा गावातील एका हॉटेलमध्ये गेल्या १५ दिवसांपासून पाहत असल्याचे डहाळे यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पालघर येथून कल्याणमध्ये आणलेल्या अजय याला बाजारपेठ पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले.