वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झालेले फौजदार चेरले सापडले नांदेडच्या दवाखान्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:26 AM2018-09-12T11:26:31+5:302018-09-12T11:27:48+5:30
बाळापुर पोलीस ठाण्यातील फौजदार तानाजी चेरले हे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झाले होते
आखाडा बाळापूर( हिंगोली) : बाळापुर पोलीस ठाण्यातील फौजदार तानाजी चेरले हे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झाले होते. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली होती. अखेर बेपत्ता फौजदार नांदेडच्या एका खाजगी दवाखान्यात उपचार घेतांना मिळून आले असून कळमनुरीचे ठाणेदार गणपत राहिरे यांनी यांचा शोध लावला आहे.
आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक तानाजी चेरले हे दिनांक दहा पासून अचानक गायब झाले होते. त्यांच्या अचानक निघून जाण्यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली होती. तानाजी चेरले यांच्या पत्नी सरस्वती चेरले यांनी आपले पती बाळापूर चे ठाणेदार व्यंकटेश केंद्रे यांच्या त्रासाला कंटाळून घर सोडून निघून गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हिंगोली पासुन ते मुंबईपर्यंतच्या पोलीस दलामध्ये एकच खळबळ माजली होती.
फौजदार चेरले निघून जाण्यामागचे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता त्या शंकांचे निरसन होणार आहे. कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांनी बेपत्ता फौजदाराचा शोध लावला. नांदेड येथील तरोडा नाका भागात असलेल्या सिटी हॉस्पीटलमध्ये तानाजी चेरले उपचार घेत असल्याची खबर मिळाल्यावर नुसार फौजदार चेरले यांना आणण्यासाठी गणपत राहिरे यांनी मध्यरात्रीच नांदेड गाठले. दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन सकाळी चार वाजता त्यांना घेऊन कळमनुरी येथे हजर झाले आहेत .थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्यासमोर फौजदार केरले यांना उपस्थित केले जाणार असून त्यानंतरच या प्रकरणाचे गूढ उकलणार आहे.