गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - कूपर रुग्णालयातून किशोर गायकवाड (३८) हा रुग्ण सोमवारी बेपत्ता झाला होता. त्याला रविवारी शोधून काढण्यात जुहू पोलिसांना यश मिळाले आहे. सतत आठवडाभर पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर वांद्रेच्या कार्टर रोडजवळून त्याला ताब्यात घेण्यात आले. गायकवाडला रविवारी जुहू पोलिसांनी शोधून काढले. वांद्रे पश्चिमच्या कार्टर रोड परिसरात तो एका दगडावर बसलेला पोलिसांना सापडला. सीसीटीव्ही अन्य तांत्रिक तपास करत गेला आठवडाभर पोलीस त्याचा शोध घेत होते. गायकवाड याला रुग्णालयातून बाहेर जाताना कूपर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षकाने त्याला पाहिले होते. मात्र, त्याने त्याला अडवले नाही. तसेच गायकवाडची मानसिक स्थिती ठिक नसल्याने त्याचा शोध घेताना पोलीस आणि त्याच्या नातेवाईकांची देखील दमछाक होत होती. गोरेगाव पश्चिमेकडील प्रेमनगर परिसरात राहणाऱ्या गायकवाडला सोमवारी रात्री त्याच्या भावाने कूपर रुग्णालयात दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी तो गायब झाला आणि याप्रकरणी घरच्यांनी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरत जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.