केंद्राच्या कृषी कायद्यांना केलेला विरोध पंजाबच्याकाँग्रेसआमदारांना भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणइंदर यांच्या विरोधातील फाईल चार वर्षांनी पुन्हा उघडल्यानंतर ईडीने आता 26 आमदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ईडी काँग्रेसच्या या आमदारांवर मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे.
ईडीने बेकायदा उत्खनन प्रकरणी या आमदारांना नोटीस पाठविण्याच्या तयारीत आहे. ईडीची कारवाई होणार असल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून आमदारांपर्यंत मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईसाठी ईडीला केंद्राची परवानगी मिळाली आहे. यामुळे ईडीच्या दिल्लीतील बड्या अधिकाऱ्यांनी जालंधरमध्ये तळ ठोकला असून ईडीच्या ऑफिसमध्ये फाईल्स तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ईडीच्या चौकशीची व्यापीती वाढू लागली असून यामुळे मुख्यमंत्र्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
महत्वाचे म्हणजे पंजाबमध्ये बेकायदा उत्खननाचा आरोप शिरोमणी अकाली दल आणि भाजपावरही लागला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब निवडणुकीवेळी मतदारांना आश्वासन दिले होते. यामध्ये त्यांनी बेकायदा उत्खनन करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाईल आणइ खाण घोटाळ्यात जो महसूल बुडाला तो वसूल केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.
मात्र, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर खाण घोटाळ्याचे आरोप अमरिंदर सरकारवरही होऊ लागले. या प्रकरणात पंजाबचे उर्जा मंत्री राणा गुरजीत सिंग यांना मंत्रिपदही सोडावे लागले. एवढेच नाही तर जालंधरच्या शाहकोटचे आमदार लाडी शेरोवालिया यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आणि त्यांच्यावर झालेल्या एका स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. यानंतर काँग्रेसच्या जवळपास दोन डझन आमदारांवर खाण घोटाळ्याचे आरोप होऊ लागले.
पंजाबवर का लक्ष?पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी सव्वा वर्ष उरले आहे. यामुळे पंजाबमधील राजकारण तापले असून भाजपा आता 117 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. तसेच काँग्रेसच्या बरोबरीला येण्यासाठी काँग्रेसला घेरण्याची तयारी सुरु केली आहे. यामुळे ईडीने अमरिंदर यांच्या मुलाची 2016 मधील फाईल पुन्हा उघडली आहे. याद्वारे दबाव वाढविण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे 26 आमदारांविरोधात तपास सुरु केला आहे. या आमदारांना तातडीने नोटीस पाठवत चौकशीला हजर राहण्यास सांगितले जाणार आहे. यासाठी त्यांची मालमत्ता आणि बँक डिटेल्स मिळविले जात आहेत.