पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी येरवडा कारागृहात असलेले आमदार अनिल भोसले यांचा जमीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. हा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी दिला. यापूर्वी एप्रिल महिन्यात अनिल भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आता गुन्हे शाखेने दोषारोप पत्र दाखल केल्यानंतरही त्यांनी केलेला दुसरा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.याप्रकरणी योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक व अधिकारी अशा १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अनिल भोसले हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांच्यासमोर सुनावणी झाली. अनिल भोसले यांच्याविरोधात प्रथमदर्शनी पुरावा नाही. अर्जदारावर ४५ कोटी रुपयांची जबाबदारी दोषारोपपत्रात निश्चित करण्यात आली आहे. त्याबदल्यात त्यांची १९० कोटी रुपयांची मालमत्ता तारण देण्याची तयारी आहे. जर त्यांची सुटका झाली तर ते गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी पैशांची व्यवस्था करुन शकतील. आम्ही १० कोटी रुपये भरायला तयार आहोत, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. आरोपीविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावा आहे. १० कोटी रुपयांतून काहीच साध्य होणार नाही. जप्त करण्यातआलेल्या मालमत्तेची किंमत फुगवण्यात आली आहे. पुराव्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याने त्यांचा जामीन फेटाळण्यात यावा, अशी मागणी गुंतवणुकदारांचे वकील सागर कोठारी यांनी केली. अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी बाजू मांडली.फॉरेन्सिंक आॅडिट सुरु असून त्यात प्रगती दिसून येत आहे. आरोपीला साक्षीदार हे सहजपणे उपलब्ध होऊ शकतील.वसुल करायची रक्कम मोठी असल्याने व प्रथर्मदर्शनी पुरावा उपलब्ध आहे. त्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याचा सरकार पक्षाचा युक्तीवाद मान्य करुन न्यायालयाने अनिल भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
आमदार अनिल भोसले यांचा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 7:25 PM