आंबेठाण : वहागाव-देशमुखवाडी (ता.खेड ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने शाळेतील विद्यार्थिनींशी अश्लीलपणे बोलून त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शाळेवर मोर्चा काढत कुलूप ठोकून शाळा बंद केली. तसेच संबधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वहागाव - देशमुखवाडी या दोन गावामिळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये वरील दोन गावांसह कोळीये येथील पाचवीतील मुलेही या शाळेत येत आहेत. जवळपास १४० पट असलेल्या शाळेत चंद्रकांत रामाणे हा मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. मात्र, पंधरा ऑगस्टपासून संबधित शिक्षकाने शाळेतील विद्यार्थिशी लगट करणे, अश्लिल बोलणे तसेच त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता. तसेच या बाबत कुठे बाहेर व्याच्याता करू नये म्हणून दमबाजी करत धमकी विद्यार्थीनींना देत होता. या गोष्टीना कंटाळून अखेर या मुलींनी ही बाब सोमवारी घरी सांगीतली. त्यामुळे दोन्ही गावातील संतप्त नागरिकांनी सोमवारी (दि ३०) सकाळी १० वाजता शाळेत एकच गर्दी केली. याची कुणकुण लागल्याने हा मुख्याध्यापक शाळेत आलाच नाही. ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधून हा प्रकार कळवला. त्याप्रमाणे केंद्रप्रमुख भारती उबाळे सकाळी शाळेत आल्या. ग्रामस्थांनी त्यांना या शिक्षकाचे अनेक कारनामे सांगितले. शाळेत रोज उशिरा येणे, मुलांना न शिकवता शाळेत झोपणे आदी तक्रारी केल्या. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी या शिक्षकावर जोपर्यंत कडक कारवाई करावी म्हणून शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे आलेली विद्यार्थी परत घरी गेले. अन्य शिक्षकांना देखील ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी सरपंच संजय देशमुख, सुभाष नवले, आत्माराम देशमुख, वहागावचे माजी सरपंच किसन बनले, तानाजी नवले, सत्यवान भालसिंग, रमेश भालसिंग आदींसह ग्रामस्थांचे वतीने देशमुख यांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. जबाबदार अधिकारी जो पर्यंत शाळेत येत नाही तोपर्यंत शाळेचे टाळे खोलले जाणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.--------------------------------------------
मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनीशी चाळे; संतप्त पालकांनी शाळेला ठोकले टाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 8:28 PM
संबधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी...
ठळक मुद्देवहागाव- देशमुखवाडीतील घटना : शिक्षकावर कारवाईची मागणी