सातारा : ‘मी मुंबईमध्ये असताना कुणीतरी माझ्या नाकावर रुमाल ठेवून मला बेशुद्ध केले होते. डोळ्यावर पट्टी बांधली आहे. टेम्पोतून माझे पोत्यात घालून अपहरण केले आहे. परंतु, थोडे मला दिसत आहे. आई मला वाचव,’ अशी विनवणी मुलगी आईला फोनवर करत होती. आईने याची माहिती मुंबईपोलिसांना दिल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले. तीन टीम तयार करून पोलीस मुलीच्या शोधासाठी रवाना झाले. मात्र, तोपर्यंत मुलगी सातारमध्ये पोहोचली अन् मुलीचे अपहरण अखेर बनाव असल्याचे समोर आले. त्यावेळी पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.
याबाबत अधिक माहिती अशी, चेंबूर (मुंबई) परिसरात राहणाऱ्या गोवंडी येथील एका सोळा वर्षाच्या मुलीने बुधवारी रात्री दहा वाजता तिच्या आईला फोन केला. माझे अपहरण झाले आहे, असे तिने आईला सांगितले. हे ऐकून आईच्या पायाखालची वाळू सरकली. आईने थेट चेंबूर परिसरातील गोवंडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलीसही खडबडून जागे झाले. संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडिलांच्या मोबाइलवर सतत फोन व मेसेज करून माहिती देत होती, माझे अपहरण झाले असून नाकावर कोणीतरी रुमाल ठेवला होता. त्यामुळे मी बेशुद्ध झाली व शुद्धीवर आल्यानंतर समजले की डोळे बांधलेले असून एका पोत्यात घातले आहे. टेम्पोमधून मला कुठेतरी घेऊन जात आहेत. असे ती सांगत होती. मुलगी सांगत असलेला प्रकार गंभीर असल्यामुळे गोवंडीचे झोनल डी. सी. पी. यांनी तत्काळ तीन पोलीस पथके तयार करून तिच्या शोधासाठी रवाना केली. झोनल डी. सी. पी. व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे स्वत: गोवंडी पोलीस ठाणे येथून पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क ठेवून होते. पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा अज्ञांतावर गुन्हाही दाखल केला.
मुलीचे लोकेशन पोलिसांनी पाहिले असता पुण्यापासून पुढे काही अंतरावर सातारा मार्गावर दाखविले. त्यानंतर पोलिसांनी सातारा शहर पोलिसांची तत्काळ संपर्क साधला. तोपर्यंत चेंबूर पोलिसांच्या दोन गाड्या शस्त्रास्त्रांसह साताऱ्याच्या दिशेने धावू लागल्या. इकडे सातारा पोलीसही अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी सज्ज झाले. रात्री दीड वाजता मुलीच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन सातारा बसस्थानक दाखविले. त्यामुळे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी बसस्थानक पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस हवालदार दत्ता पवार, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार यांच्यासह शहर पोलिसांची टीम बसस्थानकात तैनात केली. संबंधित सोळा वर्षाची मुलगी अखेर पोलिसांना बसस्थानकात सापडली. चेंबूर पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुलगी सुखरुप असल्याचे पाहून पोलिसांच्या गाडीचा वेग आपसूकच मंदावला. पण पुढे पोलिसांना प्रश्न पडला. मुलीने खोटे सांगून बनाव कशासाठी केला.
हवालदार दत्ता पवार आणि प्रवीण पवार यांनी त्या मुलीकडे चौकशी सुरू केल्यानंतर मुलीने सांगितलेली कहाणी ऐकून दोघेही अवाक् झाले. ‘माझे वडील मुंबई येथे रिक्षा चालवत असून माझ्या वडिलांची दोन लग्न झालेली आहेत. त्यांची पहिली पत्नी हैदराबाद येथे तिच्या तीन मुलांसह राहते. तिच्या दोन मुली व एक मुलगा चांगले शिकून नोकरी लागलेले आहेत. तसेच माझ्या आईला आम्ही दोन मुली असून माझी मोठी बहीण उच्च शिक्षण घेत आहे. परंतु मी दहावीतून शाळा सोडून दिली असल्याने माझी मोठी बहीण व आई सतत मला शाळा शिकण्यासाठी बोलत असतात. त्यामुळे मी घरून निघून जाण्याचा निर्णय घेतला.’ असे तिने अहपरणाच्या बनावाची कहाणी पोलिसांना सांगितली. शिक्षण टाळण्यासाठी संबंधित मुलीने जीवघेणा बनाव केला. मुंबई आणि सातारा पोलिसांना मात्र, नाहक मनस्ताप आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. मुंबई आणि सातारा पोलिसांनीही सतर्कता दाखवून मुलीला शोधण्यासाठी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. दरम्यान, संबंधित मुलीला गोवंडी पोलीस ठाणे येथून आलेल्या पोलीस पथकाच्या ताब्यात पहाटे पाच वाजता देण्यात आले.कंडक्टरला आला होता संशयशिवशाही बसच्या कंडक्टरने पोलिसांना सांगितले की, आमच्या बसमध्ये ही मुलगी मैत्रीपार्क, चेंबूर येथे बसलेली होती. ही मुलगी बसमध्ये बसल्यापासून ते सातारा येथे उतरेपर्यंत एकटीच होती. सतत कोणाला तरी मेसेज करत होती. तसेच हळू आवाजात कुणाशी तरी बोलत होती. मला तिच्या वागण्याचा थोडासा संशय आल्याने मी तिला विचारले की, तुझ्यासोबत कोणी नाहीये का? त्यावर ती मुलगी म्हणाली की, सातारा एस.टी. स्टँडवर माझा भाऊ मला न्यायला येणार आहे. त्यामुळे मी तिला जास्त काही विचारणा केली नाही.