अ‍ॅक्सिस बँकेतील २५ खातेदारांच्या खात्यातून लाखोंची रक्कम लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 03:37 AM2019-11-30T03:37:18+5:302019-11-30T03:37:27+5:30

वसई रोड पश्चिमेच्या अ‍ॅक्सिस बँकेतील पंचवीस ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.

Money deducts from Axis Bank's 25 account holders AC | अ‍ॅक्सिस बँकेतील २५ खातेदारांच्या खात्यातून लाखोंची रक्कम लंपास

अ‍ॅक्सिस बँकेतील २५ खातेदारांच्या खात्यातून लाखोंची रक्कम लंपास

Next

वसई : वसई रोड पश्चिमेच्या अ‍ॅक्सिस बँकेतील पंचवीस ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. ही रक्कम थेट गाजियाबादच्या एटीएम मशीनमधून काढण्यात आल्याचे समजते.

शुक्रवारी देखील अशाचप्रकारे रक्कम काढण्यात आल्याची माहिती खातेदार राहुल सेहगल यांनी दिली. एटीएमच्या माध्यमातून २५ ग्राहकांच्या खात्यातून परस्पर रकमा काढण्यात आल्यावर या सर्वांनी अ‍ॅक्सिस बँक तसेच माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता आमच्याकडे फसवणूक झालेल्यांपैकी १० ते ११ खातेदार आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून आवश्यक माहिती तसेच तक्रार अर्ज घेऊन आम्ही हे प्रकरण सायबर सेलकडे पाठवले आहे. तेथून सखोल चौकशीअंती या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

वसई रोड पश्चिमेच्या अ‍ॅक्सिस बँकेतील ग्राहकांना त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्यात आल्याचे मेसेज गुरुवारी सकाळी आले. तसेच ही रक्कम थेट गाजियाबाद येथील ए.टी.एम.मधून काढण्यात आल्याचे ग्राहकांना समजल्यावर फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांनी थेट बँकेच्या शाखेत धाव घेतली. २५ जणांची दिवसभरात साधारण एकाच पद्धतीने अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. काहींच्या खात्यातून ३८ हजार, ४० हजार, १ लाख १० हजार, २१ हजार, १२ हजार असे २५ जणांच्या खात्यातून साधारण कोट्यवधी रुपये हडप करण्यात आल्याचा अंदाज आहे. यातील चार ते पाच जणांच्या रकमा लाखांच्या घरात आहेत.

दरम्यान, या फसवणूक झालेल्या सर्वांनी प्रथम बँकेच्या व्यवस्थापकाला जाब विचारला असता बँकेने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वैतागून ग्राहकांनी गुरुवारी सायंकाळी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण सायबर गुन्ह्यांतर्गत येत असल्याने हे प्रकरण आधी सायबर सेलकडे जाऊन त्यांची शहानिशा करण्यात येईल.

अ‍ॅक्सिस बँकेच्या एकाच शाखेतील २५ जणांच्या खात्यातून आणि गाजियाबाद येथील एकाच एटीएममधून दोन दिवस लाखो रुपये काढण्यात आल्याने ग्राहकांनी बँकेच्या व्यवस्थापनावर संशय व्यक्त केला आहे. आमची गेलेली रक्कम पुन्हा खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Money deducts from Axis Bank's 25 account holders AC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.