ठाण्यात २०२० मध्ये पोलिसांवर झाले सर्वाधिक हल्ले; 'तो' आरोपी अद्यापही मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 02:18 AM2021-01-26T02:18:56+5:302021-01-26T02:19:08+5:30
विदारक चित्र : उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यावरही हल्ला
जितेंद्र कालेकर
ठाणे : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२० मध्ये ८१ सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. त्यात सर्वाधिक ३४ हल्ले हे पोलिसांवरच झाले. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात हे हल्ले झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावरही खुनी हल्ला झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे मार्च ते ऑक्टोबर दरम्यान जिल्हाभर संचारबंदी होती. साथ प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करीत विनाकारण तसेच विनापरवाना वाहनांमधून प्रवास करणारे, रस्त्यावर फिरणारे तसेच विनापरवाना मद्यविक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कलम १८८ नुसार कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रकार ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर व वागळे इस्टेट या परिमंडळांमधील पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात घडले.
याशिवाय, उद्योग, ऊर्जा, कामगार, आरोग्य विभाग, ठामपा, एसटी, बेस्ट, एपीएमसी, कारागृह कर्मचारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही समाजकंटकांनी लक्ष्य केल्याचे आढळून आले.
८३ जणांवर कारवाई
गेल्या वर्षभरात ३४ पोलिसांसह ८१ सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये ८३ जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ तसेच साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
‘तो’ आरोपी मोकाट
कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कणसे व चार कर्मचाऱ्यांवर काही हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना ४ ऑक्टोबर २०२०ला रात्री घडली. ५६० लीटर गावठी दारू पकडल्यानंतर या हल्लेखोरांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण कार्यालयात लाठ्यांनी हल्ला करून आरोपीचे अपहरण केले होते. तो आरोपी अजूनही हाती लागलेला नाही.